Tokyo Olympic : पी. व्ही. सिंधूचा सामना जगातल्या एक नंबरच्या खेळाडूसोबत
शनिवार, 31 जुलै 2021 (16:22 IST)
टोकियो ऑलिम्पिकमध्ये आज भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचा मुकाबला चायनीज तैपेईच्या ताई जू यिंग हिच्याशी सुरू आहे.
ताई जू यिंग सध्या जगातली क्रमांक एकची खेळाडू आहे. तिच्या नावावर आशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदक, तीनदा ऑल इंग्लंड किताब आणि पाचदा बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनची वर्ल्ड सुपर सीरिज जिंकल्याचा विक्रम आहे.
असं असलं तरी 27 वर्षीय जू यिंगला आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये पदकाची कामगिरी करण्यात यश आलेलं नाही.
सिंधूनं जर या सामन्यात जू-यिंगचा पराभव केला तर ऑलिम्पिकमध्ये तिचं दुसरं पदक निश्चित होणार आहे. विशेष म्हणजे त्यामुळं सुवर्णपदाच्या आशाही उंचावल्या जाणार आहेत.
मात्र, या सामन्यात जू यिंगला पराभूत करणं हे सिंधूसाठी मोठं आव्हान असेल. त्याचं कारण म्हणजे सिंधूनं आतापर्यंत तिच्याबरोबर 18 सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त पाच वेळा तिला विजय मिळवता आला आहे.
तसंच यापूर्वी झालेल्या तिन्ही सामन्यांमध्ये सिंधूला जू यिंग विरोधात पराभव पत्करावा लागला आहे.
उपांत्य फेरीत प्रवेश
पी. व्ही. सिंधूनं जपानच्या अकाने यामागुची हिचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूनं दोन सरळ सेटमध्ये विजय मिळवला. यासोबतच तिनं अंतिम चारमध्ये स्थान पक्कं केलं.
रिओ ऑलिम्पिकमध्ये सिंधूनं रौप्य पदकाची कमाई केली होती. अंतिम सामन्यात तिला पराभव पत्करावा लागला होता.
तसं पहायला गेलं तर पी. व्ही. सिंधूच्या नावावर आधीपासूनच अनेक रेकॉर्ड्स आहेत. आणि आता बॅडमिंटनमध्ये दोनदा ऑलिंपिक मेडल जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरू शकते. यापूर्वी कोणत्याही महिला वा पुरुष भारतीय बॅडमिंटनपटूने असा विक्रम केलेला नाही.
"गेल्यावेळी मी जेव्हा रिओ ऑलिंपिकला गेले होते, तेव्हा सगळ्यांना वाटलं - ठीक हे सिंधू गेलीय. पण यावेळी टोकियोला जाण्याआधीपासूनच लोकांना माझ्याकडून मेडलची अपेक्षा आहे. खूप अपेक्षा आहेत माझयाकडून पण हा दबाव बाजूला सारत मला खेळावर लक्ष केंद्रित करून मेडल जिंकण्याचा प्रयत्न करायचा आहे," टोकियोला जाण्यापूर्वी सिंधूने सांगितलं होतं.
रिओ ऑलिंपिक आणि टोकियो ऑलिंपिकच्या दरम्यान 5 वर्षांचा काळ गेलाय आणि दरम्यानच्या काळात सिंधू आणि कोच गोपीचंद यांची यशस्वी जोडीही फुटली आहे.
5 जुलै 1995ला हैदराबादमध्ये जन्मलेल्या जवळपास 6 फूट उंच सिंधूच्या यशाची कहाणी ही एखाद्या खेळाडूच्या सातत्य, चिकाटी, मेहनत, एकाग्रता आणि खेळावरच्या प्राविण्याची कहाणी आहे.
हैदराबादमध्ये तिला तासन् तास कोर्टवर खेळताना पाहिलेलं आहे. कोर्टवर चार तास प्रॅक्टिस करताना सिंधूचं लक्ष एकदाही विचलित झालं नाही. फक्त आणि फक्त प्रॅक्टिस.
वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि ऑलिंपिक पदक जिंकणाऱ्या सिंधुची कहाणी हे एका यशस्वी खेळाडूचे आदर्श उदाहरण आहे. पण हे यश रातोरात मिळालेलं नाही.
8 वर्षांची असताना सिंधूने बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. आईवडील व्हॉलीबॉल खेळाडू असल्याने घरात खेळाचं वातावरण होतंय.
सिंधूचे वडील रेल्वे ग्राऊंडवर व्हॉलीबॉल खेळायला जात तेव्हा सिंधू शेजारच्याच बॅडमिंटन कोर्टवर खेळत राही. तिथूनच तिच्या या प्रवासाला सुरुवात झाली. तिचे पहिले कोच होते महबूब अली. 10 वर्षांची असताना सिंधू गोपीचंद अॅकॅडमीम्ये आली. आणि पहिल्या ऑलिंपिकपर्यंतचा तिचा प्रवास गोपीचंद यांच्या सोबतीनेच झाला.
पी. व्ही. सिंधूला चाईल्ड प्रॉडिजी म्हटलं जातं. 2009मध्ये ज्युनियर एशियन बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक जिंकणाऱ्या या मुलीने नंतर मागे वळून पाहिलं नाही. 18 वर्षांची असताना सिंधूने वर्ल्ड चॅम्पियनशिपचं कांस्य पदक जिंकलेलं होतं आणि असं करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू होती. आतापर्यंत तिने अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. पण रिओ ऑलिंपिकमधलं पदक तिच्यासाठी सर्वात जवळचं आहे.
ती म्हणते, "रिओ ऑलिम्पिक माझ्यासाठी नेहमीच खास राहणार आहे. ऑलिंपिकपूर्वी मला दुखापत झाली होती. सहा महिने कोर्टच्या बाहेर होते. काय करावं, कळत नव्हतं. मात्र, माझे प्रशिक्षक आणि पालकांनी माझ्यावर विश्वास दाखवला. माझ्या मनात फक्त एकच विचार होता की ही माझी पहिली ऑलिम्पिक स्पर्धा आहे आणि मला माझा सर्वोत्तम खेळ करायचा आहे. मग एकापाठोपाठ एक सामने जिंकत गेले."
"फायनलमध्येही मी 100 टक्के दिलं. मात्र, तो दिवस कुणाचाही असू शकला असता. मी सिल्वर मेडल जिंकलं. मात्र, तेही कमी नाही. मी भारतात परतले तेव्हा गल्ली-बोळात माझं स्वागत करण्यात आलं. विचार करून आजही अंगावर रोमांच उभा राहतो."
कायमच पॉझिटिव्ह राहणाऱ्या सकारात्मक विचार करणाऱ्या लोकांपैकी सिंधू एक आहे.
रिओमध्ये फायनलला जाऊन हरल्याचं दुःख अजूनही आहे का विचारल्यावर ती सांगते, "मी हरले तेव्हा वाईट वाटलं होतं. पण तुम्हाला नेहमीच दुसरी संधी मिळते. मी ज्या मेडलचा विचारही केला नव्हता ते मिळवल्याचा मला आनंद होता."
पण हे करणं सोपं नव्हतं. गोपीचंद यांच्याकडून सिंधूने प्रशिक्षण घेतलं तेव्हा 21 वर्षांच्या सिंधूचा फोन तिच्याकडून अनेक महिन्यांसाठी काढून घेण्यात आला होता. अगदी आईस्क्रीम खाण्यासारख्या लहान लहान आनंदांपासूनही तिला दूर रहावं लागलं. ऑलिंपिक मेडल जिंकल्यानंतर आईस्क्रीम खाणाऱ्या सिंधूचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
सिंधू भारतातील सर्वाधिक यशस्वी महिला खेळाडूंपैकी एक आहे. मात्र, सोबतच सर्वांत जास्त कमावणाऱ्या महिला खेळांडूंपैकीही ती एक आहे.
फोर्ब्सच्या यादीत समावेश
फोर्ब्सने 2018 साली सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंमध्ये सिंधुच्या नावाचा समावेश केला होता. सिंधू आज स्वतः एक ब्रँड आहे आणि अनेक ब्रँड्सचा चेहराही आहे.
2018 साली कोर्टवर खेळून तिने 5 लाख डॉलर कमावले होते. तर जाहिरातींमधून तिला 80 लाख डॉलर्स मिळाले. म्हणजेच दर आठवड्याला कमीत कमी 1 लाख 63 हजार डॉलर्स. ही रक्कम अनेक क्रिकेट खेळाडूंच्या कमाईपेक्षाही जास्त आहे.
सिंधू एक यशस्वी खेळाडू तर आहेच. पण एक व्यक्ती म्हणूनही तिला तिच्या पात्रतेवर पूर्ण विश्वास आहे. तिच्या खांद्यावर असलेल्या अपेक्षांच्या ओझ्याची तिला पूर्ण कल्पना आहे. मात्र, असं असूनदेखील ती तिच्या खेळाचा पूर्ण आनंद उपभोगते.
सरावाचं शेड्यूल, जगभरात खेळण्यासाठी जाणं-येणं, बिजनेस, जाहिराती.... एका 24 वर्षांच्या मुलीसाठी हे ओझं तर नाही?
मात्र, गेमप्रमाणेच तिच्या विचारातही स्पष्टता आहे. ती म्हणते, "मी हे सगळं खूप एन्जॉय करते. लोकं विचारतात की तुझं पर्सनल लाईफ तर उरतच नसेल. पण माझ्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. मी याचा पुरेपूर आनंद घेतला पाहिजे. कारण तुम्ही कायमच लाईमलाईटमध्ये असाल, असं गरजेचं नाही. मी आयुष्यात काही मिस करतेय, असं मला कधीच वाटलं नाही. बॅडमिंटन माझी पॅशन आहे."
तर अशा आनंद आणि उत्साहाने ओतप्रोत सिंधुच्या यशाचा मंत्र काय? ती सांगते, "काहीही झालं तरी स्वतःवर विश्वास ठेवा. हीच माझी ताकद आहे. कारण तुम्ही इतर कुणासाठी नाही तर स्वतःसाठी खेळत असता. स्वतःला सांगा की मी काहीही करू शकतो."