टोकियो ऑलिम्पिक डायरी : पंधरा मिनिटांचं स्वातंत्र्य, चिंता आणि रोमांच
बुधवार, 21 जुलै 2021 (22:31 IST)
जान्हवी मुळे
टोकियोमध्ये सध्या दोन शब्द सर्वाधिक ऐकू येत आहेत. Anxiety आणि Excitement. चिंता आणि रोमांच. अशा दोन टोकांच्या भावना एकाच वेळी अनुभवणं काय असतं, ते खरंतर शब्दांत नीट मांडताही येणार नाही.
मी दिवसभर काम करून आताच हॉटेलवर माझ्या खोलीत परतले आहे. आम्हाला आता इथे पंधरा मिनिटं बाहेर जाण्याची परवानगी मिळाली आहे.
पंधरा मिनिटं म्हणजे फक्त पंधराच मिनिटं. तेही गर्दीत जायचं नाही, फक्त जरा पाय मोकळे करण्यासाठी किंवा जवळच्या दुकानातून गरजेच्या वस्तू विकत घेण्यासाठीच ही सूट मिळाली आहे. हॉटेलच्या लॉबीतच आयोजकांनी नेमलेले सुरक्षारक्षक आहेत, जे एरवीही आमच्या येण्याजाण्याची वेळ नोंदवून ठेवतात.
पंधरा मिनिटं हा केवढा कमी वेळ वाटतो, पण खरं तर टीव्ही मीडियाच्या भाषेत पंधरा मिनिटं हा खूप जास्त वेळ आहे आणि नियोजन केलं, तर सगळं वेळेत करता येतं.
आज मी फक्त समोरच्या गल्लीत गर्दी नसलेल्या फुटपाथवर थोडी चालत गेले, जवळ कुठली दुकानं आहेत हे पाहून घेतलं, म्हणजे असं नियोजन करायला सोपं जाईल.
अपेक्षेप्रमाणेच आसपास सगळेजण मास्कमध्ये आणि अंतर राखून चालत होते. पंधरा मिनिटांचा मास्कआडचा हा मोकळा श्वासही बरा वाटावा असं वातावरण होतं.
रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंच टॉवर्स आणि त्यांच्यातल्या फटीतून दिसणारा सूर्यास्त. तसं कुठल्याही शहरात हे असं एवढंसंच आभाळ वाट्याला येतं. पण इथे सगळंच बंदिस्त झालेलं असताना त्याची जाणीव आणखी तीव्रतेनं होते.
पंधरा मिनिटांच्या त्या फेरीदरम्यान मला दोन अँब्युलन्स जाताना दिसल्या. आता हे लिहते आहे, तेवढ्यातच बाहेरून आणखी एक अँब्युलन्स जाताना सायरन ऐकू येतो आहे.
टोकियोत आज अठराशेहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, असं आताच बातम्यांमध्ये सांगितलं. कोव्हिडच्या संसर्गाच्या घटना वाढतायत, इथे तिसरी लाट येण्याची भीती काहीजण बोलून दाखवतायत. आणि अशातच ऑलिम्पिकचं आयोजन होतंय.
फुटबॉल आणि सॉफ्टबॉलच्या स्पर्धा परंपरेप्रमाणे उद्घाटन सोहळ्याआधी म्हणजे बुधवारपासून (21 जुलै) सुरुही झाल्या आहेत.
एका क्षणी आम्ही मैदानात कोणता विक्रम पाहायला मिळेल याविषयी बोलतो आहोत, तोच दुसऱ्या कुणाच्या टीमचे खेळाडू विलगीकरणात असल्याचं कळतं, तिसरा तुमचे आवडते खेळाडू कोण म्हणून विचारतो तर चौथा पीसीआर टेस्टची आठवण करून देतो.
कोव्हिड टेस्टची आता खरंच सवय होऊन गेली आहे, हे मी आधीच्या डायरीमध्येही लिहिलं होतंच. आता जसजशी इथे येणाऱ्या लोकांची संख्या वाढते आहे, तसं वेगवेगळ्या भाषा कानावर पडू लागल्या आहेत.
खूप वर्षांपूर्वी भेटलेले किंवा एरवी ज्यांच्याशी इंटरनेटवरूनच संपर्क व्हायचा असे लोक प्रत्यक्ष भेटू लागले आहेत- अर्थात सोशल डिस्टंसिंगसह.
मुख्य म्हणजे बऱ्याच महिन्यांनी मी कोव्हिडशिवाय इतर विषयांवर जास्त बोलते आहे. ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांची हीच तर खासियत असते.
इथे फक्त खेळाडूंचा मेळावा भरत नाही, तर पत्रकार, स्वयंसेवक, अधिकारी, प्रेक्षक अशांच्या रूपानं अनेकजण एकत्र येतात आणि सांस्कृतिक देवाणघेवाण होते. म्हणूनच तर काहीजण ऑलिंपिकचं वर्णन 'वर्ल्ड्स बिगेस्ट इव्हेंट' म्हणजे जगातला सर्वात मोठा सोहळा म्हणून करतात.
पण यंदा अर्थातच कोव्हिडमुळे गणितं बदलली आहेत.
सकाळीच इथल्या एका पेपरमध्ये बातमी वाचली की, जपानचे सम्राट कदाचित ऑलिंपिकच्या उद्घाटन सोहळ्यात 'सेलिब्रेशन' हा शब्द वापरणार नाहीत.
हीच जपानमधल्या अनेकांची भावना आहे. जपानसाठी ऑलिंपिक ही साजरं करण्याची गोष्ट नाही, तर दिलेलं वचन पूर्ण करण्याची जबाबदारी आहे, असं त्यातून दिसून येतं.