चेक बॉक्‍सिंग स्पर्धेत भारताला सुवर्ण

सोमवार, 31 जुलै 2017 (11:19 IST)
भारतीय मुष्टियोद्धांनी चेक गणराज्यच्या 48व्या ग्रां प्री उस्ती नाद लाबेम चॅम्पियशीप स्पर्धेत शानदार प्रदर्शन करत पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्य पदक जिंकले. वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेतील कांस्यपदक विजेता शिव थापा (60 किलो), राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता मनोज कुमार (69 किलो), अमित फंगल (52 किलो), गौरव बिधूरी (56 किलो) आणि सतीश कुमार (91 किलोहून अधिक) यांनी अंतिम फेरीत आपापल्या प्रतिस्पर्धींना पराभूत करत सुवर्णपदक पटकाविले.
 
कविंदर बिष्ट (52 किलो) आणि मनीष पंवार (81 किलो) यांना रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले. तसेच सुमित सांगवान याचा उपान्त्य फेरीत पराभव झाल्याने त्याला कांस्य पदक मिळले.
 
अमित आणि कविंदर या दोघा भारतीय मुष्टियोद्धांमध्ये अंतिम सामना झाला. या दोघांमधील अमित हा लाईट फ्लाईवेटमध्ये (49 किलो) खेळतो. मात्र, या स्पर्धेत तो फ्लाईवेटमध्ये खेळला. त्याने कविंदरला 3-2 असे हरविले. त्यानंतर गौरवने पॉलंडच्या इवानो जारोस्लाववर 5-0 अशी सहज मात केली.

वेबदुनिया वर वाचा