Neeraj Chopra Classic :भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षामुळे गेल्या महिन्यात पुढे ढकलण्यात आलेली नीरज चोप्रा क्लासिक आंतरराष्ट्रीय भालाफेक स्पर्धा आता ५ जुलै रोजी बेंगळुरू येथे होणार आहे. आयोजकांनी मंगळवारी याची घोषणा केली. श्री कांतीरवा स्टेडियममध्ये होणाऱ्या या स्पर्धेत 12 खेळाडू सहभागी होतील.
या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या परदेशी खेळाडूंमध्ये दोन वेळा विश्वविजेता ग्रेनाडाचा अँडरसन पीटर्स (वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी 93.07 मीटर), 2016 ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता जर्मनीचा थॉमस रोहलर (93.90 मीटर), 2015 विश्वविजेता केनियाचा ज्युलियस येगो (92.72 मीटर), अमेरिकेचा कर्टिस थॉम्पसन (87.76 मीटर), आशियाई खेळांचा कांस्यपदक विजेता जपानचा जेन्की डीन (84.28 मीटर), श्रीलंकेचा रुमेश पाथिरेज (85.45 मीटर) आणि ब्राझीलचा लुईझ मॉरिसियो दा सिल्वा (86.34मीटर) यांचा समावेश आहे.
आयोजकांच्या मते, या स्पर्धेच्या तिकिटांची किंमत 199 रुपयांपासून ते 9,999 रुपयांपर्यंत असेल. याशिवाय,15 व्यक्तींसाठी पाच कॉर्पोरेट बॉक्स44,999 रुपयांना उपलब्ध आहेत. थ्रोअर रनवेजवळील एका खास स्टँडची किंमत 9,999 रुपये आहे, तर रनवेच्या मागे असलेल्या नॉर्थ अप्पर स्टँडमधील आणखी एका खास स्टँडची किंमत 2,999 रुपयांना उपलब्ध आहे.