मीराबाई चानू सलग दुसऱ्या वर्षी बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर

सोमवार, 6 मार्च 2023 (07:22 IST)
वेटलिफ्टर मीराबाई चानू 2022 बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर पुरस्काराची मानकरी ठरली आहे. जनतेने दिलेल्या कौलानुसार मीराबाईची निवड झाली आहे.
 
सलग दुसऱ्यांदा हा पुरस्कार पटकावणारी मीराबाई ही पहिलीच खेळाडू ठरली आहे. 2021 वर्षासाठी मीराबाईला याच पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
 
2020 टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत, मीराबाई वेटलिफ्टिंग प्रकारात सुवर्णपदकाची कमाई करणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली होती. हाच फॉर्म कायम राखत मीराबाईने इंग्लंडमधल्या बर्मिंगहम इथे झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरलं. त्याच वर्षी झालेल्या वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप रौप्यपदक पटकावलं.
 
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर पुरस्काराची मानकरी ठरल्यानंतर बोलताना मीराबाई म्हणाली, "मुली क्रीडा क्षेत्रात आल्या तर त्यांच्या शरीरावर त्याचा परिणाम होईल ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. ही अनाठायी भीती आपण घालवायला हवी."
 
पुरस्कारासाठी मीराबाईसह कुस्तीपटू विनेश फोगाट आणि साक्षी मलिक, बॉक्सिंगपटू निखत झरीन आणि बॅडमिंटन पी.व्ही.सिंधू या शर्यतीत होत्या.
 
बीबीसी पॅरा स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर ही नवीन श्रेणी यंदा तयार करण्यात आली आहे. या श्रेणीअंतर्गत भविना पटेलला सन्मानित करण्यात आलं. पॅरा टेबलटेनिसपटू भविनाने 2020 समर पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावलं होतं. पॅरालिम्पिक स्पर्धेत टेबलटेनिस प्रकारात पदक पटकावणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली होती. भविनाने 2022 मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं.
 
भविनाने पुरस्काराने गौरवण्यात आल्यानंतर बोलताना सांगितलं, "हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळणं हा माझ्यासाठी अतिशय मानाची गोष्ट आहे. महिला आणि विशेषत्वाने क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यादृष्टीने हा पुरस्कार मोलाचा आहे. बीबीसीने पॅरा खेळाडूंच्या कामगिरीची दखल घेत हा पुरस्कार अधिकाअधिक सर्वसमावेशक केला आहे".
 
भारताच्या माजी महिला हॉकी संघाच्या कर्णधार प्रीतम सिवाच यांना जीवनगौरव पुरस्काराने अर्थात बीबीसी लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं. हॉकी आणि पर्यायाने भारतीय खेळांना त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आलं. प्रतिष्ठेचा द्रोणाचार्य पुरस्कार पटकावणाऱ्या प्रीतम पहिला महिला हॉकी प्रशिक्षक होत्या. देशभरातल्या अव्वल प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येतं.
 
याप्रसंगी बोलताना सिवाच म्हणाल्या, "या पुरस्कारासाठी बीबीसीने माझी निवड केली यासाठी मी त्यांची आभारी आहे. गेल्या तीन वर्षात या पुरस्काराने अनेक ज्येष्ठ दिग्गज क्रीडापटूंना सन्मानित करण्यात आलं आहे. यंदा हा पुरस्कार मला मिळतो आहे याचा आनंद आणि समाधान आहे. हा पुरस्कार महिलांना दिला जातो हे विशेष महत्त्वाचं आहे. युवा क्रीडापटूंना भविष्यात चांगली कामगिरी करण्यासाठी असे पुरस्कार प्रोत्साहित करतात".
 
बॉक्सिंगपटू नीतू घंगासची बीबीसी इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर पुरस्कारासाठी निवड झाली. दोन वेळा युवा विश्वविजेती नीतूने कॉमनवेल्थ स्पर्धेतही पदकावर नाव कोरलं होतं. 2022 कॉमनवेल्थ स्पर्धेत मिनिममवेट गटात सुवर्णपदक पटकावलं होतं.
 
लव्हली चौबे, रुपा राणी तिर्की, पिंकी आणि नयनमोनी साइकिया या चौकडीने 2022 कॉमनवेल्थ गेम्स स्पर्धेत लॉनबॉल्स या खेळात सुवर्णपदकाची कमाई केली होती. या खेळातलं भारताचं हे पहिलंच पदक होतं. या चौघींना बीबीसी चेंजमेकर ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
 
95वर्षीय भगवानी देवी आणि 106वर्षीय रामबाई यांनाही विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. भगवानी यांनी ताम्पेरे, फिनलंड इथे झालेल्या 2022 वर्ल्ड मास्टर्स अथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत 100 मीटर स्प्रिंट प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली होती.
 
35 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांसाठी ही स्पर्धा असते.
 
शॉट पूट प्रकारातही भगवानी यांनी कांस्यपदक पटकावले. रामबाई यांनी बडोदा इथे झालेल्या 2022 नॅशनल ओपन मास्टर्स अथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत 100 मीटर आणि 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं.
 
बीबीसी न्यूजचे डेप्युटी सीईओ आणि डिरेक्टर ऑफ जर्नलिझम जोनाथन मुन्रो यांनी पुरस्कार सोहळ्यात सहभागी होता आलं याचं समाधान वाटत असल्याचं सांगितलं. बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर पुरस्कार सलग दुसऱ्या वर्षी पटकावणाऱ्या मीराबाई चानूचं मुन्रो यांनी अभिनंदन केलं.
 
बीबीसी इंडियन पॅरा स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर या नवीन श्रेणीचा अंतर्भाव आपण केला आहे याचा आनंद आहे असं मुन्रो म्हणाले.
 
बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या संचालक आणि बीबीसी न्यूज इंटरनॅशनल सर्व्हिसेसच्या सीनिअर कंट्रोलर लिलिआन लँडोर यांनी याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या. "या पुरस्कारासाठी निवड झालेल्या प्रत्येक खेळाडूने भारतीय खेळांप्रति महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. त्यांच्या गौरवशाली कारकीर्दीचा सन्मान करणे हा आनंदाचा क्षण आहे. या सगळ्याजणींनी अफाट कौशल्य, निग्रह, खेळाप्रति निष्ठा या मानकांना सिद्ध केलं आहे. केवळ भारतातल्या नव्हे तर जगभरातल्या महिलांसाठी त्यांची कामगिरी प्रेरणादायी आहे".
 
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर पुरस्कार 2019 पासून देण्यात येत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये दिमाखदार कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला क्रीडापटूंना या पुरस्काराने गौरवण्यात येतं. महिला क्रीडापटूंना वाटचाल करताना कोणत्या अडथळ्यांना सामोरे जावं लागतं याकडे हे पुरस्कार लक्ष वेधतात.
 
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झालेल्या पाच खेळाडूंची नावं फेब्रुवारीत जाहीर करण्यात आली. या पाचजणींची निवड अव्वल क्रीडापत्रकार, लेखक आणि तज्ज्ञांचा समावेश असलेल्या ज्युरीने केली होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती