विश्वविजेतेपदावर सहा वेळा मोहोर नोंदविणाऱ्या एम.सी.मेरी कोमला आणखी एका विजेतेपदाची संधी मिळणार आहे. महिलांच्या आगामी जागतिक मुष्टीयुद्ध स्पर्धेसाठी मेरी कोम व लवलिना बार्गोहेन यांची निवड करण्यात आली आहे. कनिष्ठ गटातील माजी विश्वविजेती खेळाडू निखत झरीनने मात्र या निवडीस आक्षेप घेत संघ निवडीसाठी चाचणी घेण्याची मागणी केली आहे.
निवड समितीचे अध्यक्ष राजेश भंडारी यांनी सांगितले की, इंडियन ओपन स्पर्धेत मेरी कोमने निखतला हरविले होते. मेरी कोमने यंदाही अनेक स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट केली आहे. त्यामुळेच आम्ही कोणतीही चाचणी न घेताच तिला संधी दिली आहे.