हिमा दासने पटकावले तिसरे सुवर्ण

सोमवार, 15 जुलै 2019 (09:34 IST)
भारताची सुवर्णकण्या धावपटू हिमा दासने झेक प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या क्‍लांदो स्मृती ऍथलेटिक्‍स स्पर्धेत 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. हिमाचे हे मागील 11 दिवसांतील तिसरे आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक ठरले आहे.
 
पोलंड येथे झालेल्या स्पर्धेत हिमाने महिलांच्या 200 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. पाठीच्या दुखापतीशी संघर्ष करत असलेल्या हिमाने 23.65 सेकंदाची वेळ नोंदवून अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर तीने कुंटो ऍथलेटिक्‍स स्पर्धेत 23.97 सेकंदाची वेळ नोंदवून एका सुवर्णपदकाची कमाई केली. त्यात रविवारी हिमाने 23.43 सेकंदाच्या वेळेसह आणखी एक सुवर्णपदक नावावर केले.
 
हीमा व्यतिरीक्त क्‍लांदो स्पर्धेतील इतर मैदानी खेळांमध्ये भारताच्या विपिन कसाना (82.51 मीटर), अभिषेक सिंग (77.32 मीटर) आणि दविंदर सिंग कांग (76.58 मीटर ) यांनी पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत अव्वल तिघांमध्ये स्थान पटकावले. तर, पुरुषांच्याच गोळाफेक स्पर्धेत राष्ट्रीय विक्रमधारी तेजिंदर पाल सिंग थूरने 20.36 मीटरसह कांस्यपदक जिंकले. महिलांच्या 400 मीटर शर्यतीत व्ही के विस्मयाने वैयक्तिक कामगिरी उंचावताना 52.54 सेकंदाची वेळ नोंदवून गटात अव्वल, तर सरीताबेन गायकवाडने 53.37 सेकंदासह तिसरे स्थान पटकावले.
 
दरम्यान, किर्गीझस्तान येथे पार पडलेल्या स्पर्धेत भारताने 6 सुवर्ण, 3 रौप्य व 1 कांस्यपदक पटकावले. राष्ट्रीय विक्रमधारी एम श्रीशंकरने लांब उडीत 7.97 मीटरसह सुवर्णपदक जिंकले, तर अर्चनाने 100 मीटर (11.74 सेकंद), हर्ष कुमारने 400 मीटर (46.76 सेकंद), लिली दासने 1500 मीटर (4:19.05 सेकंद), साहिल सिलवालने भालाफेकीत (78.50 मीटर) आणि महिलांच्या 4 बाय 100 मीटर रिले संघाने (45.81 सेकंद) सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला.
 
आसाममधील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या हिमाने गतवर्षी 20 वर्षांखालील जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून ऐतिहासिक भरारी घेतली होती. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय धावपटू ठरली होती. त्यानंतर तिच्या कामगिरीत सातत्य पाहायला मिळाले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती