सिनसिनाटीचे फेडररला सहावे जेतेपद

मंगळवार, 19 ऑगस्ट 2014 (12:55 IST)
सिनसिनाटी खुल्या टेनिस स्पर्धेत स्वीस खेळाडू रॉजर फेडरर याने पुरुष एकेरीचे अभूतपूर्व असे सहावे विजेतेपद मिळविले.
 
महिला एकेरीत अमेरिकेची जगात अव्वलस्थानी असलेली टेनिसपटू सेरेना विलिअम्स हिने प्रथमच सिनसिनाटी स्पर्धा जिंकली. हार्डकोर्ट टेनिसवर या दोघांनी यश मिळविले. लवकरच अमेरिकन खुली ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा खेळली जाणार आहे. त्या स्पर्धेसाठी हे विजेतेपद या दोघांनाही प्रोत्साहन देणारे ठरू शकेल.
 
फेडररने त्याच्या टेनिस कारकिर्दीतील 80 वी स्पर्धा जिंकली. याच स्पर्धेत त्याने एक हजार मास्टर्स टेनिस स्पर्धेचा 300 वा सामना जिंकून इतिहास घडविला. या स्पर्धेत त्याने त्याच्या 33 वा वाढदिवस उत्साहात विजयाने साजरा केला होता.
 
जगात तिसर्‍या स्थानावर असलेल्या स्वित्झर्लडच्या फेडररने सिनसिनाटीचे सहावे विजेतेपद मिळविताना अंतिम सामन्यात स्पेनच्या डेव्हीड  फेरर याचा 6-3, 1-6, 6-2 अशा तीन सेटनंतर पराभव केला. फेडररने सहा बिनतोड आणि विजयी सर्व्हिस केल्या. त्याने पहिल्या सर्व्हिसवर 76 टक्के गुण मिळविले त्याला हा अंतिम विजय मिळविण्यासाठी एक तास 42 मिनिटे लागली. फेडररने फेररविरुध्दचे सर्वच सर्व 16 सामने जिंकले आहेत.
 
या स्पर्धेत जेवढय़ा वेळी फेडरर अंतिम फेरीत पोहोचला त्यावेळी त्याने स्पर्धा जिंकली आहे. मी अलीकडे देशाला लहान पदके मिळवून दिली. परंतु सिनसिनाटीचा मोठा चषक जिंकल्यान मला आनंद झाला आहे, असे फेडरर म्हणाला. फेडररने येथील आपली अजिंक्यपदाची मालिका कायम राखली.
 
उपान्त्य फेरीत फेडररने मिलोस रावोनिक याचा तर डेव्हीड फेररने जुलीन बेन्नेटय़ू याचा पराभव केला होता. 

वेबदुनिया वर वाचा