रविभामा कथा सांगू लागली... एके दिवशी राजा विक्रमादित्य नदीच्या काठावर उभा राहून नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेत होता. तिक्यात राजाचे लक्ष एका गरीब कुटुंबाकडे गेलं. त्या कुटुंबात एक पुरुष, एक स्त्री व मुलगा होता. त्यांच्या अंगावरचे कपडे जिर्ण झाले होते. काही क्षणातच त्या तिघे जणांनी नदीत उड्या टाकल्या. राजा विक्रमाने क्षणातच दोन देवदत्त वेताळाचे स्मरण करून त्या तिघांचे प्राण वाचविले. गरीबीला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे ब्राह्मणाने राजाला सांगितले.
ब्राह्मण कुटुंबाला राजा आपल्या घरी घेऊन गेला. त्यांची अतिथी भवनात रहाण्याची व्यवस्था केली. अतिथी भवन प्रशस्त होतं. ब्राह्मण कुंटुंबानं मात्र त्याच्या स्वच्छतेला ग्रहण लावले होते. बरेच दिवस उलटले तरी त्यांनी आपल्या अंगावरील कपडेही बदलले नव्हते. ज्या जागी झोपत होते तेथेच थुंकत होते. अतिथी भवनाच्या चारही बाजुंनी त्यांना घाण करून ठेवली होती.
दुर्गंधीमुळे तेथील नोकर चाकर दुसरीकडे निघून गेले होते. राजाने त्याच्या सेवेसाठी आणखी काही नोकर पाठविले, मात्र ते ही काही दिवसाच त्यांच्या व्यवहाराला कंटाळून राजाकडे निघून गेले आणि त्यांनी राजाला सारी हकिकत सांगितली.
शेवटी राजा विक्रम स्वत: त्यांची सेवा करण्यासाठी नोकराच्या वेशात अतिथी भवनात पोहचला. ब्राह्मण कुटूंबाची राजाने चांगली सेवा केली. वेळ प्रसंगी त्यांचे हात पाय ही दाबले. मात्र ब्राम्हण पुरुषाचे समाधान होत नव्हते. मात्र राजाने ब्राह्मण कुटुंवाविषयी अपशब्दाचा कधी वापर केला नाही.
एके दिवशी ब्राह्मण पुरुषाने राजाची परीक्षा घेण्याचे ठरविले. राजाला त्यांनी आपल्या अंगाला लागलेली विष्ठा स्वच्छ करण्यात सांगितले. राजाने होकार देऊन विष्ठा काढून त्यांचा स्नान घालून दिला. चांगले वस्त्र परिधान करून देताच चमत्कार झाला. सर्वत्र लख्ख प्रकाश पडला आणि मंत्रमुग्ध करणारा सुगंध सर्वत्र दरवडू लागला. ब्राह्मणाचे सारे मळलेले कपडे अचानक बदलून चांगले कपडे आले. ब्राह्मण म्हणाला, ''मी वरुणराज आहे. तुझी परीक्षा घेण्यासाठी आम्ही हे रूप धारण केले होते.'' राजा विक्रमाचा अतिथी सत्कार पाहून ते खूष झाले होते. वरूणराज यांनी राजाला वरदान दिला व ते अदृश्य झाले.