सिंहासन बत्तिशी (प्रस्तावना)

खूप खूप वर्षांपूर्वी उज्जैन नगरीत भोज नामक राजा राज्य करत होता. राजा पराक्रमी व दानशूर होता. 
 
नगरीला लागूनच एक शेत होते. शेतकर्‍याने शेतात विविध प्रकारच्या भाज्या लावल्या होत्या. शेताच्या मध्यभागी शेतमालकाचे घर होते. त्यात तो रहात होता. एके दिवशी तो घराच्या छतावर उभा राहून ओरडू लागला, ''राजा भोजला पकडून आणा...त्याला शिक्षा द्या.''
 
ही बातमी वार्‍यासारखी सार्‍या राज्यात पोहचली. अर्थात ती राजा भोजलाही‍ कळली. राजाने त्या शेतात जाण्याचे ठरविले. दरबारी अधिकार्‍यांसह राजा भोज शेतात पोहचला. ''राजाला तात्काळ पकडून आणा, त्याने माझे राज्य त्याने घेतले आहे!'' असे तो शेतमालक मोठ्याने ओरडत असल्याचे राजाने पाहिले.
 
राजाला शेतमालकाच्या बोलण्याचे आश्चर्य वाटले. राजा रात्रभर त्याच विचारात होता. सकाळी राजाने ज्योतिषी व पंडित यांना तातडीने दरबारात बोलावले. त्यांना सारी हकिकत सांगितली. त्या शेतमालकाच्या घराच्या खाली धन आहे, असा निष्कर्ष ज्योतिष व पंडित यांनी काढून राजाला सांगितले. राजाच्या आज्ञेनुसार शेतमालकाचे घर खोदण्यात आले. 
 
खूप खोदल्यानंतर जमिनीत एक सिंहासन दृष्टीस पडले. सिंहासनांच्या चौफेर आठ- आठ पुतळ्या उभ्या होत्या. ते पाहून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. शेकडो मजुर लावूनही सिंहासन हलता- हलत नव्हते. एका पंडिताने राजाला बळी देण्यात सांगितले. राजाने त्या जागी बळी देताच सिहांसन लगेच जमिनीतून वर सरकले. ते पाहून राजाला आनंद वाटला. सिंहासन हे पूर्णपणे सोन्याचे असून रत्नजडीत होते. सिंहासनाच्या चारही बाजुला आठ-आठ पुतळ्या उभ्या होत्या. त्याच्या हातात एक-एक कमळाचे फूल होते. सिंहासनाची साफसफाई करून राजा भोजसमोर ते ठेवण्यात आले. 
 
तत्पूर्वी, राजाने ब्राह्मणाकडून चांगला मुहूर्त काढला. त्या मुहूर्तावर राजा भोज सिंहासनावर विराजमान होणार होता. राजवाड्यासह सार्‍या नगरीत शहनाई गुंजू लागल्या. परप्रांतील राजे- महाराजे उपस्थित होते. 
 
सिंहासनजवळ राजा भोज उभा होता. राजाने सिंहासनावर बसण्यासाठी उजवा पाय पुढे केला, तोच सगळ्या पुतळ्या मोठ्या हसू लागल्या. राजा घाबारला. त्याने पाऊल मागे घेतले व पुतळ्यांना हसण्याचे कारण विचारले. 
 
त्यातील पहिली पुतळी रत्नमंजरी म्हणाली, ''राजन! आपण तेजस्वी आहात, बलवान आहात, मात्र कोणत्याही गोष्टीचा गर्व करणे चांगले नाही. ज्या राजाचे हे सिहांसन आहे. त्यांच्याकडेही तुझ्यासारखे हजारो नोकर होते.'' हे ऐकून राजा भोज संतापला. 
 
''हे सिंहासन राजा विक्रमादित्य यांचे आहे.'' असे रत्नमंजरीने सांगताच. राजाने संताप गिळला व म्हणाला, ''पुतली राणी, जर स्पष्ट शब्दात सांगितले तर बरे होईल.'' 
 
तेव्हा ती पुतळी म्हणाली, ''तर ऐका..!'' 

सिंहासन बत्तिशीची कथा क्र.1. वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

वेबदुनिया वर वाचा