हिंदू धर्मानुसार शिव शंकराने नाग आपल्या गळ्याभोवती गुंडाळला आहे. तसेच विष्णूने शेषनागाचे सिंहासन करून नागाचे महत्त्व सांगितले आहे. जैन धर्मात पार्श्वनाथाला शेष नागावर बसविले आहे. श्रीकृष्णाने यमुना नदीला कालिया नागाच्या तावडीतून सोडविले होते तर शेष नागाच्या फण्यावर पृथ्वी फिरत आहे, असा पुराणात उल्लेख आला आहे. अथर्ववेदात काही नागांच्या नावांचा उल्लेख आढळतो. त्यात श्वित्र, स्वज, पृदाक, कल्माष, ग्रीव व तिरिचराजी यांचा समावेश आहे.