पिठोरी अमावास्या: मातृदिन म्हणून साजरी केली जाणारी श्रावणी अमावस्या

शनिवार, 4 सप्टेंबर 2021 (15:38 IST)
मातृत्वाचा गौरव करण्याचा दिवस म्हणजे पिठोरी अमावस्या. श्रावण अमावास्येला पिठोरी अमावास्या म्हणतात. चौसष्ट योगिनी या व्रताच्या देवता आहेत. पिठोरी अमावस्येचंच दुसरं नाव मातृ दिन. वंशवृद्धी तसेच मुलांच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा केली जाते. स्त्रीला सौभाग्य व तिच्या मुलांना दीर्घायुष्य, आरोग्य देणारी ही अमावस्या आहे.
 
ज्या स्त्रियांची मुले अल्पायुषी ठरतात किंवा ज्यांची मुले जगत नाहीत अशा फक्त सुवासिनी स्त्रिया पिठोरीचे व्रत ठेवतात. या दिवशी दिवसभर उपास करुन संध्याकाळी चौसष्ट योगिनींची पूजा करतात. पूर्वी पिठाच्या मूर्ती करायचे परंतु आता यांच्या चित्राच्या कागदाची पूजा केली जाते. या दिवशी नैवेद्याला सर्व पिठाचेच पदार्थ करतात,म्हणून या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. बेदाणे घातलेली भाताची खीर हा खास नैवेद्य असतो. 
 
घरातील मुलांसाठी खीरपुरीचे किंवा पुरणपोळीचे जेवण तयार केलं करतात. पूजा करुन झाल्यावर पु्रणाची आरती केली जाते आणि खिरीच्या वाटीवर पुरी झाकून आई ते पक्क्वान आपल्या खांद्यावरुन मागे नेत विचारते, “अतीत कोण?” (किंवा अतिथी कोण?) तेव्हा घरातील मुले आपले नाव सांगुन नैवेद्य हातातून घेतात व अशा प्रकारे पूजा पूर्ण होते.
 
या दिवशी स्त्रिया पूजा करुन सौभाग्य व तिच्या मुलांना दीर्घायुष्य व आरोग्य मिळावं अशी प्रार्थना करतात. म्हणून स्त्रीला संतान सुख देणारी अमावस्या मातृदिन म्हणून ओळखली जाते. श्रावण वद्य अमावास्येलाच दर्भग्रहणी अमावस्या ही म्हणतात.
 
आपल्या संस्कृतीमध्ये आईला फार महत्व आहे कारण माता केवळ मुलांचीच नव्हे तर त्यांच्या संस्कारांचीही जननी आहे. वात्सल्याने भरलेल्या आईची तुलना देवाशी केली जाते. तिला देवतेऐवढे स्थान असल्यामुळेच प्रेमाने माऊली अशी हाक दिले जाते. त्याग, सेवा, समर्पण, प्रेमाची मूर्ती म्हणून मातृदिन उत्साहाने साजरा केला जातो. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती