Shravan Friday Special : जिवती पूजेचं महत्त्व

शुक्रवार, 1 सप्टेंबर 2023 (07:00 IST)
श्रावणातल्या चारी शुक्रवारी जिवतीची पुजा करावी. ही पुजा संतती रक्षणार्थ मानली जाते. जिवतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जो वार (उदा. मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार) येईल त्या दिवशी देवघरात लावावा.
 
जिवती प्रतिमेत किंवा पानावर नरसिंह, कालियामर्दन करणारा कृष्ण, मुलांना खेळवणाऱ्या जरा- जिवंतिका आणि बुध - बृहस्पती (गुरु) यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांचे पूजन केलं जातं. 
 
प्रथम भगवान नरसिंह
भगवान विष्णूंचा चवथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळ भक्तासाठी प्रगट झाले. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकश्यपू पासून म्हणजेच देत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पुजले जातात.
 
कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण
यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्हीपण श्रावणातील आराध्य दैवत मानले गेले आहे. कालियामर्दन प्रसंगाबद्दल बोलायचा तर या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळात असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या- बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला तसेच कालियाला अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असताना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्णाचे येथे कालियामर्दन रूपात पूजन केलं जातं.
 
जरा व जिवंतिका
या यक्ष गणातील देवता असून यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथेप्रमाणे मगध नरेश बृह्दरथ याला दोन राण्या असतात. दोन्हीही राण्यांवर प्रेम करणार्‍या राजाला मात्र संतान नव्हती. दरम्यान नगराजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजल्यावर राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रगट करतात. ऋषी राजाला प्रसादात आंबा देऊन राणीला खायला द्यायला सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना दिल्यामुळे कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा- अर्धा. अशा विचित्र आणि अर्धवट अभ्रकांना राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते आणि ती दोन्ही अभ्रक तुकड्यांना हातात घेऊन आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने दोनीही शकलं सांधते. जरा ते सांधलेले अभ्रक संध्यासमयास बृह्दरथ राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंघ ठेवतो. जरा यक्षिणीच्या उपकाराप्रीत्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्ट देवतेचा मन देतो. त्याच प्रमाणे जारदेवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो, अशी ही जरा देवी.
 
जारेंचीच सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती असा होय. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा केली जाते. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवते अशा रूपात दाखवल्या गेल्या आहेत. 
 
बुध
बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो. तर बृहस्पती (गुरु) वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवलं जातं. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्त्व, वाक्पटुत्व असे गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते. बुधाचं वाहन हत्ती आणि हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तात आपल्या बुद्धिमत्तेने, व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येते. बृहस्पतीचं वाहन वाघ अर्थात हे अहंकाराचा प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो ज्याने मानवाच्या प्रगतीमध्ये, आध्यात्मिक साधनेत बाधक ठरु शकतो. त्यावर आपण ज्ञानाच्या, गुरुकृपेच्या आशीर्वादाने नियंत्रण मिळावं हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते. म्हणूनच बुध - बृहस्पती यांना सुद्धा जिवती प्रतिमेत स्थान मिळालं.
 
प्रथम रक्षक देवता, नंतर बालकेचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि नंतर व्यक्तिमत्त्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा जिवती प्रतिमेचा क्रम. एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जिवती पूजन.
 
जरे जीवन्तिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी ।
रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते ।।

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती