2020 या वर्षात मानवी इतिहासात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत का?

मंगळवार, 29 डिसेंबर 2020 (15:37 IST)
मयुरेश कोण्णूर
सरत आलेलं 2020 हे साल 'कोरोनाचं साल' म्हणून त्याची इतिहासात नोंद होईल. मानवाच्या शरीरात एका विषाणूनं प्रवेश केला आणि त्यानंतर आधुनिक जगानं मृत्यूचं थैमान पाहिलं.
 
मध्ययुगातला संघर्ष, गत शतकातली महायुद्धं ही जगाच्या निवडक भूभागांवर घडून आली होती. जीवघेण्या विषाणूंच्या साथीही भयानक ठरल्या, पण तरीही काही भूभाग त्यांच्यापासून दूर राहू शकले. पण कोरोनाच विषाणू या वर्षाच्या अंताला अंटार्क्टिकापर्यंतही पोहोचला. दळणवळणाच्या अत्याधुनिक साधनांनी त्याचा प्रवास सुकर केला.
मृत्यूचे आकडे प्रत्येक प्रांतातून दिवसागणिक येत गेले. अर्थचक्र थांबलं आणि त्यानंही जीव घेतले. त्यामुळे आपल्या हयातीत हे मानवजातीवरचं अभूतपूर्व संकट पाहणाऱ्यांना हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की, मानवाच्या इतिहासात हे वर्ष सर्वाधिक मृत्यूंचं ठरलं का?
 
या प्रश्नाचे दोन भाग आहेत. एक म्हणजे यंदा कोरोना विषाणूमुळे, वैद्यकीय कारणांनी, मृत्यू होणाऱ्यांची संख्या जास्त आहे का? दुसरा भाग म्हणजे या वर्षी आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक मानवी हानी झालेलं हे वर्षं आहे का?
 
सर्वाधिक मृत्यूंचं कारण हे हृदयरोग
कोरोना विषाणूचा प्रसार वेगानं झाला आणि जगभरातून येणारे मृत्यूंचे आकडे ऐकून आपण सगळेच घाबरलो. रोजचे आकडे काही हजारांच्या घरांमध्ये जाऊ लागले. अगोदर इटली, त्यानंतर अमेरिका-ब्राझिल इथल्या आकड्यांनी आघाडी घेतली. भारताचे आकडेही दडपण वाढवणारे होते.
 
पण त्यामुळे यंदा कोरोनामुळं झालेल्या मानवी मृत्यूंची संख्या सर्वाधिक आहे आहे का? तुलना केली तर त्याचं उत्तर नाही असं मिळतं. आजही जगभरातल्या सर्वाधिक मानवी मृत्यूंचं कारण हे हृदयरोग हे आहे.
'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम' नं त्यांच्या एका लेखात जगभरात कोरोनामुळं यंदा झालेल्या मृत्यूंच्या भयावह पार्श्वभूमीवर इतर कारणांमुळे होणारे मानवी मृत्यूंची आकडेवारी दिली आहे. त्यात त्यांनी 'ऑक्सफर्ड विद्यापीठा'च्या 'मार्टीन' स्कूल'च्या 'अवर वर्ल्ड इन डेटा' प्रकल्पातल्या 2017 साली झालेल्या एकूण मानवी मृत्यूंची आणि त्याच्या विविध कारणांची आकडेवारी संदर्भासाठी घेतली आहे.
 
त्या आकडेवारीनुसार, त्या वर्षी जेव्हा जगभरात एकूण 5.6 कोटी माणसांचा मृत्यू झाला होता, तेव्हा दिवसाला 1 लाख 47 हजार 118 जण मृत्यू पावले. यात सर्वाधिक जण हे हृदयरोगामुळे मृत्यूमुखी पडले आणि प्रत्येक दिवशी ती संख्या होती 48742. त्याखालोखाल आकडे होते कॅन्सरचे ज्यामुळं प्रत्येक दिवशी 26181 जण मृत्यूमुखी पडले.
 
या आकडेवारीनुसार दर दिवशी श्वसनसंस्थेच्या विकारांमुळे 10724 जण, 7010 जण हे फुफ्फुसांना झालेल्या संसर्गामुळे, 2615 जण हे एचआयव्ही एड्स मुळे मरण पावले. हे आकडे प्रत्येक दिवसाचे आहेत आणि इथे उध्दृत केलेल्या कारणांव्यतिरिक्तही अन्य कारणंही आहेत. अर्थात हे आकडे जगभरातले सरासरी आहेत आणि प्रत्येक देशासाठी ते वेगवेगळे आहेत.
 
'जागतिक आरोग्य संघटने'नं म्हणजे WHO नं 9 डिसेंबर 2020 रोजी प्रकाशित केलेल्या त्यांच्या एका लेखात 2019 सालच्या मृत्यूंची आकडेवारी दिली आहे. त्यानुसार 2019 मध्ये ज्या एकूण 5.54 कोटी माणसांचा मृत्यू झाला त्याची पहिली 10 महत्त्वाची कारणं दिली आहेत.
 
त्यातही हृदयरोग, श्वसनसंस्थेचे विकार ही पहिली दोन महत्त्वाची कारणं आहेत ज्यात लाखो जणांचा जीव गेला आहे. या पाहणीतलं सर्वांत महत्त्वाची कारण म्हणजे पहिल्या 10 कारणांतील 7 कारणं ही असंसर्गजन्य रोगांची आहेत.
2019 मध्ये एकूण मृत्यूंपैकी 74 टक्के मृत्यू हे असंसर्गजन्य रोगांनी झाले. हृदययरोग हे आजही सर्वांत जास्त मानवी मृत्यूंचं कारण आहे आहे 2000 ते 2019 मध्ये या मृत्यूंची संख्या 20 लाखांवरुन 89 लाखांपर्यंत पोहोचली आहे.
 
या आकड्यांशी या वर्षी आतापर्यंत कोरोना संसर्गामुळे झालेल्या जगभरातल्या मृत्यूची आकडेवारीची तुलना केली तर आपल्याला स्पष्ट कल्पना येते. WHO नं त्यांच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीप्रमाणे 27 डिसेंबर 2020 पर्यंत जगभरात 17,51,311 मृत्यू कोविड-19 मुळे झाले आहेत.
 
ही आकडेवारी एकट्या हृदयविकारांमुळे जगभरात दरवर्षी होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येशी पडताळून पाहिली तरीही कमी आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग, त्यामुळे दिवसागणिक झालेले मृत्यू, त्यावर कमी पडलेले आधुनिक वैद्यकीय उपचार, त्यामुळे जगभरात झालेलं लॉकडाऊन आणि परिणामी पदरात आलेलं प्रचंड आर्थिक नुकसान आणि या सगळ्याचं मानवजातीवर अचानक झालेलं आक्रमण पाहता या संकटाचा परिणाम अभूतपूर्व आणि मोठा आहे.
 
पण त्यामुळे सर्वाधिक मानवी मृत्यू झाले का, तर याचं उत्तर आकडेवारी 'नाही' असं देतं.
 
यापूर्वी आलेली जागतिक संकटं आणि मानवी मृत्यू
कोरोनाकाळात जगाच्या कानाकोपऱ्यातून येणारे मृत्यूचे हे आकडे ऐकतांना, आपल्या मूळ प्रश्नाचा दुसरा भागही, अनेकांच्या मनात आला असेल. तो म्हणजे मानवाच्या इतिहासात हा एका विशिष्ट कारणामुळे कमी काळात झालेले हे सर्वाधिक मृत्यू आहेत का?
मानवाचा इतिहास हा निर्सगाच्या प्रतिकूल रुपातही त्याच्यासमोर उभं राहण्याचा आहे, जेव्हा वैद्यकीय ज्ञान-तंत्रज्ञान उपलब्ध नव्हतं तेव्हा विषाणूंना सामोरं जाण्याचा आहे, अर्थशास्त्राचा विचार सर्वांची भूक भागवण्याची सर्वांगिण योजना प्रत्यक्षात आणत नव्हता तेव्हा भूक शमविण्याचा आहे, विस्तारवादाच्या स्वप्नानं लादलेल्या अनेक युद्धांचा आणि त्यात झालेल्या संहाराचा आहे.
 
त्यामुळे यापूर्वीही असे अनेक प्रसंग इतिहासात पहायला मिळतात जेव्हा मृत्यूनं जणू तांडव केलं आहे. कोरोनाकाळाची त्या काळाशी तुलना करता आपल्याला हे जाणवतं की यापेक्षाही भयानक काळ यापूर्वी आला आहे. या सगळ्या घटनांची आणि त्यात झालेल्या मृत्यूंची यादी मोठी होईल. त्यातल्या काही महत्वाच्या घटना मात्र इथं नोंदवता येतील.
 
यातली सर्वांत दुर्दैवी वर्षं 1918चं नोंदवता येईल जेव्हा 'स्पॅनिश फ्लू'नं जगभर थैमान घातलं होतं. या वर्षाची 2020शी तुलना करणं आवश्यक ठरेल कारण त्या वर्षीही जगानं पूर्वी न अनुभवलेलं वैद्यकीय आव्हान समोर उभं होतं. पण त्या वर्षी जगानं अनुभवलेला संहार कोरोनाकाळापेक्षा कैक पटीनं अधिक होता.
 
पहिल्या महायुद्धाच्या हानीतून जग सावरत होतं आणि 'स्पॅनिश फ्लू'ची साथ सर्वत्र पसरली. नेमके किती मृत्यू झाले या एक आकडा नाही, पण जगभरात 5 ते 10 कोटी लोकांचे जीव या साथीनं घेतले असं म्हटलं जातं.
 
भारतातही या साथीनं थैमान घातलं होतं आणि त्यात भारतात जवळपास 1 कोटी 80 लाख लोकांचे जीव गेले. भारताच्या तेव्हाच्या लोकसंख्येच्या ते 6 टक्के एवढे होते. पहिल्या महायुद्धानं जेवढा संहार केला नाही तेवढा या स्पॅनिश फ्लू'नं केला असंही म्हटलं गेलं.
 
एका शतकाअगोदरचा तो काळ, त्यामुळे वैद्यकीय ज्ञानही आजच्या काळाच्या तुलनेत ते तोकडं होतं. तरीही तेव्हाचे आकडे आणि आजचे आकडे पाहता, आज आपण अनेक जीव वाचवू शकलो आहोत असं म्हणता येईल.
 
युद्धांमध्ये कमी काळात अनेक जीव जातात. संपत्तीचा आणि जीवांचा तो संहार विनाशक असतो. आधुनिक जगानं आजवर दोन महायुद्धं अनुभवली.
दुसरं महयुद्ध आजवरचं सर्वात भयानक मानलं जातं. सहा वर्षांचा या युद्धाचा कालखंड होता, पण हे जगाच्या बहुतांश भूभागावर पसरलं होतं आणि रोज शेकड्यानं सैनिक आणि नागरिक यांचे मृत्यू होत होते.
 
अनेक मृत्यूंची नोंद झाली, अनेक समजलेच नाहीत. जवळपास 5 ते 6 कोटी सैनिक आणि नागरिक यांचे या युद्धात बळी गेले. जर्मन छळछावण्यांमध्ये 60 लाख ज्यूंचे जीव गेले असं म्हटलं गेलं. या युद्धानं केलेला हा विनाश पाहता कोरोनकाळात जगावर आलेलं संकट आणि झालेले मृत्यू यांची तुलना करता येईल.
 
भारताच्या इतिहास असं एक साल अजून सांगता येईल ज्यानं मृत्यूचं तांडव पाहिलं ते म्हणजे 1943 जेव्हा बंगालचा दुष्काळ आला होता. ब्रिटिश काळातल्या या दुष्काळाच्या भयानक आठवणी आजही भारतात जिवंत आहेत. बंगाल प्रांतात 3 कोटी लोकांचे भूकेनं बळी गेले होते.
 
तत्कालिन ब्रिटिश साम्राज्यात दुसऱ्या महायुद्धात गेलेल्या बळींपेक्षा हा आकडा सहा पटीनं अधिक होता असं सांगितलं जातं. दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती असतेच, पण त्यासोबतच तत्कालिन ब्रिटिश सरकारची धोरणंही या मृत्यूंना कारणीभूत ठरली असं म्हटलं गेलं.
तेव्हा दुसरं महायुद्ध सुरू होतं आणि सैनिकांना अन्नाची कमतरता भासेल म्हणून बंगालमधल्या भुकेल्यांपर्यंत अन्न पोहोचलं नाही अशी टीका झाली. पण या आपत्तीनं कोट्यावधींचे प्राण घेतले.
 
असे अनेक कालावधी इतिहासात सापडतात ज्यात माणसांची आयुष्यं त्यांच्या नैसर्गिक अवधीपूर्वीच संपली. असाच एक कालावधी आपण वर्तमानात पाहतो आहोत. 2020 सालाची नोंद इतिहासात तशीच होईल.
 
इथं नोंद केवळ याचीच आहे की यापेक्षाही विनाशक कालावधी यापूर्वीही येऊन गेले आहेत आणि कोरोनापेक्षाही जीवघेणी वैद्यकीय संकटं वर्तमानातही आहेत, पण तरीही माणूस उभा आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती