Republic Day 2023 :प्रजासत्ताक दिनाचं पहिलं संचलन कधी झालं होतं? वाचा अशा 13 प्रश्नांची उत्तरं

बुधवार, 25 जानेवारी 2023 (13:50 IST)
प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाला अवघे काही तास बाकी आहेत. त्यासाठीची तयारीही नवी दिल्लीत सुरू झाली आहे.मात्र, अजूनही भारताच्या प्रजासत्ताक दिनाबाबत आणि त्या संदर्भातील इतर अनेक गोष्टींची माहिती अनेकांना नसते. तर अशा 13 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आम्ही या बातमीतून देणार आहोत :
 
1. प्रजासत्ताक दिन काय असतो आणि का साजरा केला जातो?
 
भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारतानं राज्यघटना स्वीकारली.
 
या राज्यघटनेनुसार, भारत लोकशाहीप्रधान देश बनला. भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आलं. त्यामुळे दरवर्षी 26 जानेवारी हा दिवस 'प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा केला जातो.
 
2. प्रजासत्ताक दिन साजरा करण्यास कधीपासून सुरुवात झाली?
 
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी 26 जानेवारी 1950 रोजी 21 तोफांच्या सलामीसह ध्वजारोहण केलं आणि भारताला 'प्रजासत्ताक राष्ट्र' म्हणून घोषित केलं. त्यानंतर प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिन साजरा केला जाऊ लागला.
3. भारतानं राज्यघटना कधी स्वीकारली?
 
भारत अनेक राज्यांचा मिळून बनलेला देश आहे. भारतात संसदीय लोकशाही व्यवस्था आहे. भारतीय राज्यघटनेनुसार ही व्यवस्था देशात राबवण्यात आली.
 
घटनासभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला आणि 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटना लागू झाली.
 
4. भारतीय राज्यघटनेत पंचवार्षिक योजनेची संकल्पना कुठून घेण्यात आली होती?
 
भारतीय राज्यघटनेतील पंचवार्षिक योजनेची संकल्पना सेव्हिएत संघाच्या (USSR) घटनेतून घेण्यात आली होती.
 
5. प्रजासत्ताक दिनी झेंडा कोण फडकवतं?
 
देशाचे प्रथम नागरिक म्हणजेच राष्ट्रपती हे प्रजासत्ताक दिनी समारंभात सहभागी होतात. राष्ट्रपतीच या दिवशी झेंडा फडकवतात.
 
6. राज्यांच्या राजधानीत प्रजासत्ताक दिनी झेंडा कोण फडकवतं?
 
राज्यांच्या राजधानीत राज्यपाल प्रजासत्ताक दिनी झेंडा फडकवतात.
 
भारतात स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन असे ध्वजारोहणाचे दोन कार्यक्रम होतात.
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात राष्ट्रीय राजधानीत देशाचे पंतप्रधान, तर राज्यांच्या राजधानीत मुख्यमंत्री झेंडा फडकवतात.
 
7. नवी दिल्लीतभव्य संचलनात सलामी कोण स्वीकारतो?
 
भारताचे राष्ट्रपती नवी दिल्लीत होणाऱ्या संचलनात सलामी स्वीकारतात. कारण राष्ट्रपती हे भारताच्या सशस्त्र दलांचे कमांडर-इन-चीफही असतात. या संचलनात भारतीय सैन्य आपल्या नव्या टँक, मिसाईल, रडार इत्यादींचं प्रदर्शनही करतं.
 
8. 'बीटिंग रिट्रीट' नावाचा सोहळा कुठे होतो?
 
बीटिंग रिट्रीटचं आयोजन रायसिना हिल्सवर राष्ट्रपती भवनासमोर केलं जातं. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे राष्ट्रपतीच असतात.
 
बीटिंग रिट्रीट सोहळ्याला प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा समारोपही म्हटलं जातं. प्रजासत्ताक दिनानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे 29 जानेवारीच्या संध्याकाळी बीटिंग रिट्रीटचा सोहळा आयोजित केला जातो.
 
बीटिंग रिट्रीटमध्ये लष्कराचे तिन्ही दल पारंपरिक वाद्य वाजवत मार्च संचलन करतात.
 
9. भारताचा राष्ट्रीय ध्वज कुणी तयार केला होता?
 
भारताचा राष्ट्रीय ध्वज पिंगली वेंकय्या यांनी तयार केला होता. पिंगली यांनी सुरुवातीला जो झेंडा तयार केला होता, त्यात केवळ लाल आणि हिरवा असे दोन रंग होते. त्यांना हा झेंडा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या बेजवाडा अधिवेशनात महात्मा गांधी यांच्यासमोर सादर केला होता. त्यानंतर गांधीजींच्या सूचनेनुसार झेंड्यात पांढऱ्या रंगाची पट्टी जोडण्यात आली.
पुढे चरख्याच्या जागी राष्ट्रीय प्रतीक म्हणून अशोकचक्राला जागा देण्यात आली.
 
आज असलेला भारताचा झेंडा हा 22 जुलै 1947 रोजी आयोजित घटनासभेच्या बैठकीत स्वीकारला गेला होता. भारतात तिरंग्याचा अर्थ राष्ट्रीय ध्वज आहे.
 
10. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार कधी दिले जातात?
 
राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशातील शूर मुला-मुलींना दिले जातात. या पुरस्काराची सुरुवात 1957 साली झाली. पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असं पुरस्काराचं स्वरूप आहे. पुरस्कार मिळालेल्या मुलांच्या शालेय शिक्षणासाठी आर्थिक सहाय्यसुद्धा केले जाते.
11. प्रजासत्ताक दिनाचं संचलन कुठून सुरू होतं?
 
प्रजासत्ताक दिनाचं संचलन राष्ट्रपती भवनापासून सुरू होतं आणि इंडिया गेटच्या इथं संपतं.
 
12. पहिल्या प्रजासत्ताक दिनी भारताचे राष्ट्रपती कोण होते?
 
पहिल्या प्रजासत्ताक दिनी डॉ. राजेंद्र प्रसाद हे भारताचे राष्ट्रपती होते. राज्यघटना लागू झाल्यानंतर डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी संसद भवनाच्या दरबार हॉलमध्ये राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली होती आणि त्यानंतर संचलन सोहळा पार पडला. त्यानंतर एर्विन स्टेडियममध्ये त्यांनी राष्ट्रध्वज फडकवलं होतं.
 
13. भारताची राज्यघटना किती दिवसात तयार करण्यात आली होती?
 
घटनासभेने जवळपास तीन वर्षात (2 वर्षे 11 महिने 17 दिवस) भारताची राज्यघटना तयार केली होती. या दरम्यान 165 दिवसांमध्ये 13 सत्रांचं आयोजन केलं होतं.

Published By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती