तोतरेपणा: लहान मुलांमधला तोतरेपणा कसा ओळखायचा, त्याच्यावर काय उपचार असतात?

शुक्रवार, 31 मे 2024 (12:18 IST)
मूल जन्माला आलं की अगदी पहिल्या आठवड्यापासून त्याच्या प्रगतीचे टप्पे आपल्या लक्षात येऊ लागतात. बाळाचा आकार, त्याच्या हालचाली या सगळ्या विशिष्ट टप्प्यांनी होताना दिसतात. अर्थात हे टप्पे सर्वच मुलांचे एकसारखे नसतात. काही मुलं लवकर पालथं पडायला शिकतात, बसायला शिकतात, उभं राहातात नंतर चालूही लागतात. काही मुलं लवकर हुंकार द्यायला सुरुवात करतात मग हळूहळू ती एकेक शब्द अडखळत बोलत नंतर लवकरच संवाद साधू शकतात.
 
परंतु ही प्रगती सर्वच मुलांची एकसारखी नसते. अनेक मुलांना हे टप्पे अनेक अडथळ्यांना मागे टाकत पार करावे लागतात. व्यवस्थित बोलू लागणे हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. या टप्प्यावर काही मुलांना तोतरेपणाशी लढावं लागतं. याच तोतरेपणाची आपण येथे माहिती घेणार आहोत. तोतरेपणा आणि बोबडेपणा या दोन गोष्टी वेगळ्या आहेत, हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे.
 
तोतरं बोलणं म्हणजे काय?
काही मुलं शब्दाची, वाक्याची सुरुवात करताना पहिल्या अक्षरावर बराच वेळ अडखळतात, त्या अक्षरावर ती भरपूर जोर देऊन भरपूर प्रयत्नांनी ते उच्चारतात आणि मग पुढचा शब्द बोलतात. यासाठी त्यांना पहिल्या अक्षरावर मोठा आघात करुन बोलल्यासारखे प्रयत्न करावे लागतात. जसं की आई म्हणायचं असेल तर ते मूल अ...आ..आ...आ...आई... असा प्रयत्न करुन बोलेल. किंवा दूध म्हणण्यासाठी द....दद...दू..दूध... असं. यासाठी मुला भरपूर कष्टपूर्वक उच्चार करावे लागत आहेत हे दिसून येतं. या परिस्थितीला थोडक्यात तोतरं बोलणं असं म्हटलं जातं. यामध्ये मुलाला आपल्याला काय बोलायचं आहे हे निश्चित माहिती असतं पण ते उच्चार करताना अडखळतं. एकाच अक्षराचा अनेकवेळा उच्चार करतं. मला काहीतरी सांसांसांगायचंय..... आआआई अशाप्रकारे मूल बोलत असेल तर ते तोतरं बोलत आहे का याचं निरीक्षण करावं. मूल काहीतरी सांगण्यासाठी शारीरिक हावभावांची फारच मदत घेतंय का आणि चेहरा, हाताचा अगदी जास्त प्रयत्नपूर्वक वापर करू पाहातयं का याचं निरीक्षण करू शकता. बहुतांशवेळा ही मुलं बोलण्याआधी श्वास रोखून धरतात किंवा मोठा श्वास घेतात. त्यांचं श्वसन सामान्य प्रकारचं नसल्याचं दिसतं. चेहऱ्यावरील भाव आणि हाताबरोबरच शब्द बाहेर पडण्यासाठी पाय आपटण्यासारखी कृती केली जाते. तसेच आपण तोतरं बोलतोय हे लपवण्यासाठी मुलं बोलणंच टाळतात किंवा उत्तर आपण विसरून गेलो आहोत असा भास निर्माण करतात. काही मुलं अगदी शांत होऊन जातात. तोतरेपणा हा असा वेगवेगळा असतो. त्याचा अनुभव प्रत्येक मुलामध्ये वेगळ्याप्रकारे दिसून येतो.
 
तोतरेपणा साधारणतः कोणत्या वयात लक्षात येतो आणि त्याचे प्रकार आहेत का?
मुलांमधलं तोतरेपण हे साधारणतः दोन ते सहा वर्षांच्या वयामध्ये दिसून येतं. कालांतराने कमी होतं. तर याचा दुसरा एक प्रकार आहे तो म्हणजे मोठी मुलं किंवा प्रौढांना स्ट्रोक, डोक्याला मार बसणे, काही औषधं किंवा मानसिक धक्का, भावनिक धक्का यांच्यामुळे तोतरेपणाला सामोरं जावं लागतं. तोतरेपणाचे हे दोन्ही प्रकार एकमेकांपेक्षा अगदी वेगवेगळे आहेत. तोतरेपण हे काही आठवड्यांपासून काही महिने-वर्षांपर्यंत असू शकतं. तोतरेपण कशामुळे येतं याची निश्चित कारणं नाहीत. परंतु मेंदूमधील शब्द, उच्चार यांच्यासाठी कार्य करणाऱ्या भागाच्या विकासात अडथळा आल्यास हा त्रास होऊ शकतो असं मानलं जातं. याबाबत बीबीसी मराठीशी फरिदाबाद येथिल अमृता हॉस्पिटल येथे कार्यरत असणाऱ्या पेडिएट्रिक न्युरोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. प्रतिभा सिंघी यांनी माहिती दिली. त्या सांगतात, “तोतरेपणा ही एक गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. व्यवस्थित बोलण्यासाठी, उच्चारांसाठी मेंदूमधील विविध भाग, श्वसनप्रणाली, स्वरयंत्र आणि स्नायू यांच्यात ताळमेळ असावा लागतो. त्यामध्ये अडथळा आल्यास हा त्रास उद्भवतो. साधारणपणे 5 टक्के मुलांना तोतरेपणाला सामोरं जावं लागतं, त्यातील बहुतांश मुलं थोडी मोठी झाल्यावर त्यावर मात करतात. साधारणतः 1 टक्का लोकांना याचा दीर्घकाळ त्रास होतो.”
 
मूल तोतरं बोलतंय याकडे कसं लक्ष द्यायचं?
बहुतांश पालक तोतरेपणामुळे घाबरुन जातात. मुलाच्या वाढीच्या काळात त्याचं फक्त निरीक्षण केलं तरी अनेक बदल लक्षात येतात. आपलं मुलाच्या बोलण्याकडे आणि उच्चाराकडे अगदी सुरुवातीपासून लक्ष द्या असं बालरोगतज्ज्ञ सांगतात. डोंबिवली मधील अरिंदम मदर अँड चाइल्डकेअर हॉस्पिटलमधील डॉ. हेमराज इंगळे यांनी याबद्दल बीबीसी मराठीला अधिक माहिती दिली. ते सांगतात, “साधारणतः मूल तीन ते सहा महिने इतका काळ तोतरं बोलत असेल तर त्याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. बोलताना, उच्चार करताना त्याला त्रास होतोय का हे पाहावं, तसेच घरातील कोणाला पूर्वी तोतरेपणा किंवा संवादासंबंधी त्रास असेल तर अधिक लक्ष देण्याची गरज असते. तोतरेपणा लक्षात आल्यावर घरातील वातावरण संवादासाठी चांगलं मोकळं असं आम्ही सुचवतो. मुलाला भरपूर वेळ द्यावा, त्याला काय सांगायचं आहे नीट ऐकून घ्यावं. त्याच्याबरोबर वेगळं बसून त्याच्याशी गप्पा माराव्यात. एखाद शब्द कसा बोलावा हे सांगण्यापेक्षा ते मूल काय सांगू पाहातंय याकडे जास्त लक्ष द्यावं. त्याच्या बोलण्यात मध्येच थांबवून सुधारणा करण्यापेक्षा त्याच्याकडे नीट लक्ष देऊन ऐकावं. त्याच्याशी अगदी शांतपणे आणि हळू बोलावं. यामुळे कदाचित मुलावर असलेलं वेगानं बोलण्याचं दडपण कमी होऊ शकतं.” डॉ. प्रतिभा सिंघी सांगतात, “वेगवेगळ्या प्रयत्नांबरोबर मुलावर काही मानसिक आघात किंवा भीती वाटतील असे काही प्रसंग त्याने अनुभवलेत का याचीही तपासणी करावी. तोतरेपणामुळे मुलाच्या आत्मविश्वासावर परिणाम होऊ शकतो त्यामुळे त्याकडे शक्य तितक्या लवकर लक्ष द्यावं.”
 
पालकांनी काय करायचं?
बऱ्याचदा तोतरेपणाशी लढणाऱ्या मुलांचे पालक जास्तच त्रस्त होतात आणि सगळं लक्ष मुलांचं बोलणं दुरुस्त करण्याकडेच ठेवतात. अशा पालकांना मुलं काय सांगत आहेत याकडे लक्ष द्या असं सांगितलं जातं. मुलांना नीट बोलू द्यावं, त्यांच्याकडे आपलं लक्ष आहे याची जाणिव करुन द्यावी. तू सांगत असलेली माहिती मी नीट ऐकतोय, ऐकतेय याची जाणिव त्यांना करुन द्यावी, तुम्ही त्यांच्या बोलण्यात रस घेताय हे त्यांना कळलं पाहिजे. अशा मुलांना धडाधड प्रश्न विचारू नयेत, प्रश्नांचा मारा करू नये. एकावेळेस एकच प्रश्न विचारावा. त्याचं उत्तर आलं की मग पुढे जावं. हा सगळा संवाद अगदी शांत, निवांत पद्धतीने झाला पाहिजे. घरात भरपूर लोक असतील अनेक लोकांनी त्यांच्याशी वेगवेगळ्या पद्धतीने संवाद साधावा, गप्पा माराव्यात, ते काय बोलत आहेत हे ऐकून घ्यावं. पालकांना स्वतःमध्येही बदल करावे लागतात. ते म्हणजे आपण मोठे झालो आहोत, मूल लहान आहे याची जाणिव ठेवावी. ते वेगानं आपल्यासारखं बोलेल, आपल्यासारखी प्रगती करेल अशी अपेक्षा ठेवू नये. आपल्या बोलण्याचा, संवादाचा, उच्चाराची फेक, आवाज, वेग कमी पातळीवर आणावा. मुलाच्या संवादामध्ये त्याचं कौतुक करावं त्याच्याशी सकारात्मक गोष्टी बोलाव्यात. एखादं वाक्य नीट बोलल्यास अरे वा हे तू न अडखळता बोललास असं म्हणून पाथ थोपटावी.
 
Published By- Dhanashri Naik 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती