८ मार्च, आज जागतिक महिला दिन. मुळात महिला दिन हा वर्षातून एकदाच का साजरा करायचा हे मला समजत नाही. आमचे आजोबा, प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे, "बांधवांनो, महिलांबद्दल जितका-जितका आदर तुम्ही आपल्या अंतःकरणात साठवत जाल, वाढवत जाल तितके शिवराय तुमच्यावर फार प्रसन्न होतील" त्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जशी ३६५ दिवस साजरी व्हायला हवी तसंच महिलांचा म्हणजे खऱ्या अर्थाने ह्या जगतनियंत्याचा सन्मान ३६५ दिवस साजरा झाला पाहिजे. असो.
राजकारणात किंवा समाजकारणात कार्यरत असणाऱ्या महिलांनाही माझं आवर्जून सांगणं आहे तुम्ही कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही, तुम्ही थेट निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हा, तुम्हाला अपेक्षित बदल तुम्हीच घडवू शकता आणि जग बदलवू शकता.