धावत्या रेल्वेत बाळाचा जन्म

गुरूवार, 28 एप्रिल 2022 (17:47 IST)
भोकर तालुक्यातील बटाळा येथील नाजुकाबाई अनिल कवडेकर ही गर्भवती महिला पती,दोन मुलींना सोबत घेऊन रेल्वेने भोकर येथून किनवटकडे माहेरी जात होती. मात्र प्रवासादरम्यान, या महिलेला रेल्वेतच प्रसुती कळा येण्यास सुरुवात झाली. याचवेळी इस्लापुर इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर प्रदीप शिंदे हे याच रेल्वेने प्रवास करत होते. तेव्हा त्यांनी महिलेच्या पतीला विश्वासात घेऊन इतर काही महिलांच्या मदतीने रेल्वेतच या महिलेची सुखरूपपणे प्रसूती केली.
 
प्रसुतीदरम्यान, या महिलेनं एका बाळाला जन्म दिला. मात्र प्रसुतीनंतर रक्तस्त्राव होत असल्याने डॉक्टरांनी तातडीने त्यांना हिमायतनगर इथल्या प्राथमिक रुग्णालयात दाखल केलं. सध्या आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगण्यात आलं आहे. रेल्वेत प्रसुती झालेल्या नाजुकाबाई यांना मिळालेल्या डॉक्टरांची आणि सह प्रवाशांची मदत महत्वाची ठरली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती