मंत्री बच्चू कडूंच्या अडचणीत वाढ; जामीन मिळण्याची शक्यता कमीच

गुरूवार, 28 एप्रिल 2022 (14:58 IST)
राज्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर आर्थिक अपहार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अकोला न्यायालयाच्या आदेशानंतर सिटी कोतवाली पोलीसांनी ही कार्यवाही केली. कलम 405, 409, 420, 468 आणि 471 या पाच कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. हे सर्व गुन्हे अजामीनपात्र असल्याने त्यांना अटक होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
अकोला जिल्ह्यातील तीन रस्ते कामांत 1 कोटी 95 लाखांच्या आर्थिक अपहाराचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता. अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांच्या कामांना मंजूरी दिल्याचा आरोप वंचितनं केला होता. न्यायालयानं या प्रकरणात अपहार झाल्याचं प्राथमिक मत नोंदवत गुन्हे दाखल करण्याचे आदेश सिटी कोतवाली पोलिसांना दिले होते. पालकमंत्री बच्चू कडूंनी अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर निधी वळता करीत 1 कोटी 95 लाखांचा अपहार केल्याचा आरोप वंचितनं केला होता. पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेला डावलत आपल्या मर्जीतील रस्त्यांची कामं नियमबाह्यपणे करवून घेतल्याचा आरोप वंचितनं केला. यातील दोन रस्ते अस्तित्वातच नसल्याचे पुरावे त्यांनी सादर केले होते. यात जिल्हा परिषदेच्या अधिकारावर पालकमंत्र्यांनी अतिक्रमण केल्याचं वंचितनं म्हटलं होतं. दरम्यान, वंचितच्या तक्रारीनंतर अकोल्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरांनी या तीन रस्त्यांसह 25 कामांना दिली स्थगिती दिली होती.
 
याप्रकरणी पोलिस कारवाई होत नसल्यानं वंचितनं अकोला जिल्हा न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर जिल्हा न्यायालयाने या प्रकरणात सकृतदर्शनी गैरव्यवहार झाल्याचं प्राथमिक निरिक्षण नोंदवलं होतं. यासंदर्भात पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर कारवाईसाठी राज्यपालांची परवानगी घेण्याचं न्यायालयानं सुचित केलं होतं. यासाठी 90 दिवसांची मुदत देण्यात आली होती. यासंदर्भात वंचितच्या शिष्टमंडळानं 7 फेब्रूवारीला प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची भेट घेत कारवाईसाठी परवानगीची मागणी केली होती. मात्र, वंचितनं यासंदर्भात सर्वात आधी आरोप केल्यानंतर बच्चू कडू यांनी आर्थिक अनियमिततेचे आरोप फेटाळले होते. यासंदर्भात वंचितकडून तांत्रिक बाबींचा आधार घेत गैरसमज पसरवला जात असल्याचं राज्यमंत्री कडू म्हणाले होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती