सुप्रिया सुळेंचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेससह महाविकास आघाडी स्वीकारेल का?

रविवार, 11 जून 2023 (10:04 IST)
नाही म्हणता-म्हणता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर भाकरी फिरवलीच.
शरद पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा, नेते-कार्यकर्त्यांचा विरोध आणि त्यानंतर माघार इत्यादी नाट्य ताजं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 24 व्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर आणखी एक नाट्य घडलं.
 
पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातील भाषणातून शरद पवारांनी आपल्या पक्षाच्या नवीन कार्याध्यक्षांची नावे जाहीर केली.
 
यामध्ये त्यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना पक्षाचे कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त केलं आहे.
 
खरं तर, शरद पवारांचे पुढील वारसदार कोण, या प्रश्नाचं उत्तर या नियुक्तीतून मिळाल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.
 
पण नव्या नियुक्तींनंतर पक्षाचं राजकारण कोणत्या दिशेने जाईल, तसंच चार वर्षांपूर्वी शरद पवारांनी बनवलेल्या महाविकास आघाडीतील इतर पक्षांचे नेते त्यांचं नेतृत्व स्वीकारतील का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
 
राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकारांशी बातचित करून याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा बीबीसी मराठीनं प्रयत्न केलाय.
 
भाकरी पचेल की अजीर्ण होईल?
26 एप्रिल 2023. मुंबईत राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे युवा मंथन नावाचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी केलेल्या भाषणामध्ये पवार यांनी भाकरी फिरवण्याचं वक्तव्य सर्वप्रथम केलं होतं.
 
शरद पवार त्यावेळी म्हणाले, “समाजात काही व्यक्तींना पद असो अथवा नसो कार्यकर्त्यांमध्ये सन्मान असतो. तो सन्मान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला पुढील पायरीवर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. यासाठी वर्गवारी कशी करायची याचा विचार करायला हवा.”
 
“संघटनेच्या माध्यमातून योग्य ती संधी देऊन एक नवीन नेतृत्व तयार केले जाईल. भाकरी ही फिरवावी लागते. ती फिरवली नाही तर करपते. ती भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. आता विलंब करून चालणार नाही. ते काम पक्षात करण्याचा आग्रह सर्व वरिष्ठ नेत्यांकडे केला जाईल.”
 
माध्यमं आणि विश्लेषकांनी शरद पवारांच्या या विधानाचे वेगवेगळे अर्थ त्यावेळी काढले. पण, पुढे कोणतं नाट्य समोर येणार आहे, याची कल्पना कुणी केलेली नव्हती.
 
त्यानंतर 2 मे 2023 रोजी शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या राजकीय आत्मचरित्राच्या सुधारित आवृत्तीचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमातच शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडण्याबाबत विचार बोलून दाखवला आणि नाट्याला सुरुवात झाली.
 
त्यानंतर पुढचे तीन-चार दिवस शरद पवारांच्या राजीनाम्याचा विरोध म्हणून नेते-कार्यकर्त्यांनी उपोषण-आंदोलन-घोषणाबाजी केली. त्यानंतर अखेर, शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा आपण मागे घेत आहोत, असं म्हटलं.
 
पवार म्हणाले, "कार्यकर्त्यांच्या भावनेचा आदर राखत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे. मी पुनश्च: अध्यक्षपद स्वीकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणं आवश्यक असते, असे माझे स्पष्ट मत आहे. माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपवणे, नवीन नेतृत्त्व निर्माण करणे यावर माझा भर असेल."
 
यानंतर एका महिन्यातच शरद पवारांनी आपल्या उत्तराधिकाऱ्यांची निवड केली. त्याची रितसर घोषणा पवारांनी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात केली.
नव्या नियोजनानुसार, शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेससाठी दोन कार्याध्यक्ष निवडले. त्यामध्ये प्रफुल्ल पटेल यांना मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड आणि गोवा तसंच राज्यसभेच्या कामकाजाची जबाबदारी दिली.
 
तर सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब राज्यांव्यतिरिक्त महिला, युवा आणि लोकसभा तसंच केंद्रीय निवडणूक अधिकार समिती यांच्या कामकाजाची जबाबदारी देण्यात आली आहे.
 
याचा अर्थ सुप्रिया सुळे यांच्याच नेतृत्वाखाली महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करणार आहे.
 
शिवाय, सध्याचं राजकीय समीकरण पाहता, हा बदल केवळ राष्ट्रवादी काँग्रेससाठी मर्यादित असणार नाही. तर महाविकास आघाडीतील इतर पक्षांसाठीही या निर्णयाला महत्त्व असणार आहे.
 
म्हणजेच, शरद पवारांनी त्यांच्या बाजूने भाकरी फिरवली आहे. आता इतरांना ही भाकरी पचते की करपट ढेकर येण्याचं ते कारण ठरेल, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
 
‘अजित पवारांना मान्य नसेल तर..’
शरद पवारांनी सुळे आणि पटेल यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर काही वेळाने अजित पवारांनी ट्वीट करून त्यांचं अभिनंदन केलं आहे.
 
पण ही घोषणा होत असताना अजित पवार मान घालून बसलेले होते, यासंदर्भातील व्हीडिओ माध्यमांमध्ये दाखवण्यात येत आहेत.
 
पण य दोन्ही नावांची घोषणा होताच माध्यमांमध्ये सर्वप्रथम अजित पवारांचीच चर्चा पाहायला मिळाली. आता अजित पवार काय करतील, असा सूर उमटत असल्याचं दिसून येतं.
 
ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर यांच्या मते, “शरद पवारांचा निर्णय अजित पवारांना मनापासून मान्य असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या भविष्यातील वाटचालीवर आणि शक्तीवर विशेष काही परिणाम होणार नाही. पण अजित पवारांना हा निर्णय मान्य नसेल, तर मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगिरीवर मोठा परिणाम होऊ शकतो.”
 
नानिवडेकर म्हणतात, “या निर्णयावर अजित पवार अभिनंदनपर ट्वीट केलेलं आहे. पण तसं असलं तरी त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे, हे कळू शकलेलं नाही.
 
“अशा स्थितीत अजित पवार यांच्या मनात काही वेगळं सुरू असल्यास आधीच राजकीय उलथापालथी सुरू असलेल्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वेगळं काही ट्विस्ट दिसू शकतं,” असं नानिवडेकर यांनी म्हटलं.
 
बंड झाल्यास ‘मोठे भाऊ’ नसतील
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या निर्णयामुळे बंड उफाळून आल्यास त्याचा परिणाम केवळ पक्षच नव्हे तर महाविकास आघाडीवरही होऊ शकतो, असं नानिवडेकर यांना वाटतं.
त्या म्हणतात, “महाविकास आघाडीचा कर्ताधर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच आहे. त्यांच्यात बंड झालं तर त्यांचं आघाडीतील सर्वोच्च स्थान निघून जाऊ शकतं. कदाचित महाविकास आघाडी मोडू शकते किंवा आघाडी कायम राहिली तरी त्यांना त्यामध्ये दुय्यम स्थान घ्यावं लागू शकतं.
 
“उद्धव ठाकरे यांच्या पक्षात बंड झाल्यानंतर ते महाविकास आघाडीत बॅकफूटवर गेले आहेत, या उदाहरणाशी हे जोडून पाहता येऊ शकेल,” असं त्यांनी म्हटलं.
 
"सुप्रिया सुळेंचं नेतृत्व पूर्वीपासूनच निश्चित"
याबाबत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सुजाता आनंदन यांच्याशीही बीबीसीने चर्चा केली.
 
सुप्रिया सुळे यांनाच राष्ट्रवादी पक्षाचं नेतृत्व मिळेल, हे पूर्वीपासून निश्चित होतं, असं मत सुजाता आनंदन यांनी व्यक्त केलं.
 
त्या म्हणतात, "सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्षपद मिळालं. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस कशा प्रकारे स्वीकारते हे आधी पाहावं लागेल.
 
"सुप्रिया सुळेंना नेतृत्व मिळणार, हे अजित पवारांनाही माहीत होतं. कारण, शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना 2008 पासून सुनियोजित पद्धतीने पक्षात पुढे आणलं. कारण त्यावेळी त्यांच्यासमोर शिवसेनेचं उदाहरण होतं.
 
"उद्धव ठाकरेंची निवड होताच राज ठाकरेंनी बंड केलं होतं. तसं आपल्या बाबतीत घडू नये यासाठी शरद पवारांनी आपला उत्तराधिकारी नेमण्याची गडबड केली नाही. पण पूर्वीपासूनच सुप्रियाला हे नेतृत्व देण्याचा विचार त्यांच्या मनात होता. पण ते कशा प्रकारे करावं, याची ते वाट पाहत होते.
 
"गेल्या महिन्यात अध्यक्षपदाचा राजीनामा देणं ही त्यासाठीचा निर्णय घेण्याची सुरुवात होती. हे नाट्य पूर्वनियोजित होतं, या माध्यमातून त्यांनी राष्ट्रवादी पक्षातील आपलं स्थान दर्शवून दिलं."
 
आता सुप्रिया सुळेंच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यासाठी त्यांची वर्णी कार्याध्यक्षपदावर लावण्यात आली आहे, असंही सुजाता आनंदन यांनी म्हटलं.
 
याबाबत मृणालिनी नानिवडेकर म्हणतात, “सुप्रिया सुळेही गेल्या दशकभराहून अधिक काळ सक्रिय आहेत. लोकसभेत त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली आहे. आता महाराष्ट्रातही त्यांनी लक्ष घातलेलं आहे. त्यामुळे त्यांना नेतृत्व मिळणार ही अपेक्षा सर्वांना होती. आता नेमकं तेच घडलं आहे.”
 
"सुप्रियांना स्वीकारण्याचं काम राष्ट्रवादीचं, मविआचं नव्हे"
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुजाता आनंदन याविषयी म्हणतात, “सुप्रिया सुळे यांना स्वीकारावं की नाही, हे काम राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे. महाविकास आघाडीच्या अंतर्गत तो विषय नाही. कारण कार्याध्यक्ष नेमलेलं असलं तरी शरद पवार अजूनही अध्यक्ष आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील महत्त्वाचे निर्णय त्यांच्या मार्फत घेतले जातील, हे निश्चित आहे.”
 
आनंदन यांच्या मते, “काँग्रेस पक्षात मल्लिकार्जून खर्गे यांना अध्यक्षपद आहे. पण निर्णयप्रक्रियेत राहुल गांधी यांचं स्थान इतर पक्षांना माहीत आहेत. त्याच प्रमाणे महाविकास आघाडीची सूत्रे पुढील काही काळ शरद पवारांकडेच असतील.”
 
ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रशांत दीक्षित यांच्या मते, “शरद पवारांच्या निर्णयाचा महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल, हे आताच सांगता येणं कठीण आहे. त्यांनी प्रफुल्ल पटेल यांना दुसरे कार्याध्यक्ष केलं आहे, पण त्याला फारसं महत्त्व नाही. सध्या तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत शरद पवार हेच चर्चा करतील, अध्यक्षपदी तेच असल्याने सूत्रे त्यांच्याच हातात असतील.”
 
सुप्रिया सुळे यांच्यासमोर आव्हान आणि संधीही
कार्याध्यक्षपदावर नेमणूक झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांच्यासमोर आव्हानही आहे आणि संधीही आहे, असं मत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रशांत दीक्षित यांनी व्यक्त केलं.
 
प्रशांत दीक्षित म्हणतात, "शरद पवारांना सुप्रिया सुळे यांच्याकडे नेतृत्व द्यायचं होतं तर ते त्यांनी चार-पाच वर्षांपूर्वीच करणं अपेक्षित होतं. हे आधीच झालं असतं तर सुप्रिया सुळे यांना स्वतंत्रपणे पक्षावर पकड मिळवता आली असती.
 
"कारण आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणतेही आमदार शरद पवारांना आव्हान देण्याच्या स्थितीत नाहीत. त्याचवेळी ते अजित पवारांचं ऋणही अमान्य करत नाहीत. अशा स्थितीत आमदारांच्या मनात जी द्विधा मनस्थिती निर्माण होणार आहे, त्याकडे ते कशा पद्धतीने पाहतात हे पाहावं लागेल.
 
"प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक बाबींमध्ये कधीच नव्हते, यापुढेही नसतील. त्यामुळे सुप्रिया सुळे या सगळ्या गोष्टी कशा हाताळतात, हा प्रश्न आहे.
 
"मीडियामधून प्रसिद्धी मिळणं, संसदेतून चांगलं काम करणं, हे वेगळं काम असतं, पण संघटनात्मक बांधणी आणि संघटनेवरील पकड या वेगळ्या गोष्टी असतात."
 
सुप्रिया सुळे पक्षावर पकड मिळतील का, यावर भाष्य करताना प्रशांत दीक्षित 'वेट अँड वॉच'चा सल्ला देतात.
 
"तुलना करायची झाल्यास मोदी-शहा यांची सरकारवर पकड आहे, तशीच पक्षावरही आहे. अशा पद्धतीने संघटनेवर पकड सुप्रिया सुळे किती दिवसांत मिळवतात, आगामी निवडणुकांपूर्वी ही पकड त्यांना मिळवता येईल का, हा कळीचा मुद्दा आहे. पण हे कळण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी तरी जावा लागेल, मगच यासंदर्भात ठोस असं काही सांगता येईल," असं प्रशांत दीक्षित यांना वाटतं.
 








Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती