महाराष्ट्रात 5 टप्प्यांत अनलॉक होणार की नाही? गोंधळ का झालाय?
गुरूवार, 3 जून 2021 (20:49 IST)
कोरोना लॉकडाऊन : महाराष्ट्रात 5 टप्प्यांत अनलॉक होणार की नाही? गोंधळ का झालाय?
राज्यात लॉकडाऊनचे नियम शिथील होणार का, यावरून मोठ्या प्रमाणावर संभ्रमाचं वातावरण पहायला मिळालं.
हा गोंधळ निर्माण व्हायला कारणीभूत ठरली मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेली घोषणा.
राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे अशा ठिकाणी लॉकडाऊन हटविण्यात येणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.
कोणत्या जिल्ह्यांमध्ये कशापद्धतीनं निर्बंध हटवले जातील, यासंबंधीची रुपरेखाही त्यांनी मांडली.
मात्र थोड्याच वेळात ही लॉकडाऊन हटविण्याबद्दलची अधिकृत घोषणा नसल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं.
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेविषयीचे निकष सर्व प्रशासकीय घटक आणि जिल्ह्यांकडून व्यवस्थित तपासून घेण्यात येत आहेत. संपूर्ण आढावा घेऊन याची अंमलबजावणी केली जाईल. याविषयीची सुस्पष्ट माहिती अधिकृत निर्णयाद्वारे कळविली जाईल, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं.
त्यामुळेच लॉकडाऊन हटविला जाणार की नाही याबाबत मुख्यमंत्री कार्यालय आणि पुनर्वसन मंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव होता की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला.
या गोंधळानंतर विजय वडेट्टीवार यांनी आपत्ती आणि व्यवस्थापनाच्या बैठकीत अनलॉकच्या निर्णयाला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे, असं स्पष्टीकरण दिलं. नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही सारवासारव केली.
यासंदर्भातली अधिकृत घोषणा मुख्यमंत्री स्वतः करतील असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.
विमानतळावर माध्यमांशी बोलल्यानंतरही वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषदही घेतली. त्यावेळीही त्यांनी तत्वतः शब्द सांगायचा राहून गेला असं म्हणत राज्यात टप्प्याटप्प्यानेच निर्बंध शिथील केले जातील असं म्हटलं.