'अनलॉकच्या नियमांना तत्वतः मान्यता, अजून अधिकृत घोषणा नाही'

गुरूवार, 3 जून 2021 (20:03 IST)
राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे अशा ठिकाणी लॉकडाऊन हटविण्यात येणार असल्याची माहिती कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
 
मात्र, ही लॉकडाऊन हटविण्याबद्दलची अधिकृत घोषणा नसल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
 
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडच्या उपलब्धतेविषयीचे निकष सर्व प्रशासकीय घटक आणि जिल्ह्यांकडून व्यवस्थित तपासून घेण्यात येत आहेत. संपूर्ण आढावा घेऊन याची अंमलबजावणी केली जाईल. याविषयीची सुस्पष्ट माहिती अधिकृत निर्णयाद्वारे कळविली जाईल, असं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
 
त्यामुळेच लॉकडाऊन हटविला जाणार की नाही याबाबत मुख्यमंत्री कार्यालय आणि पुनर्वसन मंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव होता की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
 
आपत्ती आणि व्यवस्थापनाच्या बैठकीत अनलॉकच्या निर्णयाला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे, असं विजय वडेट्टीवार यांनी लॉकडाऊनच्या नियमांच्या घोषणेबद्दल स्पष्टीकरण देताना म्हटलं.
 
यासंदर्भातली अधिकृत घोषणा मुख्यमंत्री स्वतः करतील असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं.
 
विजय वडेट्टीवार यांनी काय म्हटलं होतं?
पॉझिटिव्हिटी रेटनुसार जिल्ह्यांची पाच टप्प्यांत विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये अठरा जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन पूर्णपणे हटविण्यात आला आहे. उद्यापासून (4 जून) अनलॉकची प्रक्रिया सुरू होईल, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं.
 
पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांत थिएटर्स, कार्यालय, सलून, जिम, शूटिंग सुरू होणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
 
लग्न सोहळ्यासाठी 200 लोकांची परवानगी देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. आंतरजिल्हा प्रवेशाला मुभा असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.
 
ठाणे, औरंगाबाद, लातूर, नांदेड, जालना, परभणी, बुलढाणा, नाशिक, जळगाव, धुळे, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या अठरा जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यांत समावेश आहे.
 
दुसऱ्या टप्प्यात मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबारचा समावेश आहे. या ठिकाणी कलम 144 लागू राहील. विवाहाला उपस्थित पाहुण्यांच्या संख्येवरही बंधनं आहेत. या ठिकाणी जिम, सलून, पार्लरही पूर्ण क्षमतेनं सुरू होणार नाहीत.
 
तिसऱ्या टप्प्यांत अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली आणि साताऱ्यामधील लॉकडाऊन हटवला जाईल.
 
चौथ्या टप्प्यांतील जिल्ह्यांमध्ये पुणे आणि रायगड असून पाचव्या टप्प्यांतील जिल्ह्यांमध्ये 'रेड झोन'मधील उर्वरित जिल्ह्यांचा समावेश आहे.
 
राज्यात 30 मे रोजी लॉकडाऊनबाबतचे नवीन नियम जाहीर करण्यात आले होते.
 
'ब्रेक दि चेन'चे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून निर्बंध शिथील करण्यात येतील असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार ही सवलत देण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती