राज्यात शुक्रवारपासून या 18 जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन नाही

गुरूवार, 3 जून 2021 (17:02 IST)
राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के आहे अशा ठिकाणी लॉकडाऊन हटविण्यात येत असल्याची माहिती कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
 
पाचव्या टप्प्यात अनलॉक होणार असून पहिल्या टप्प्यात थिएटर्स, कार्यालय, सलून, जिम, शूटिंग सुरू होणार असल्याचं वडेट्टीवार यांनी सांगितलं.
 
लग्न सोहळ्यासाठी 200 लोकांची परवानगी देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. आंतरजिल्हा प्रवेशाला मुभा असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे.
 
पॉझिटिव्हिटी रेटनुसार जिल्ह्यांची चार पातळ्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या पातळीमधील जिल्ह्यांमध्ये अठरा जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन पूर्णपणे हटविण्यात आला आहे.
 
लॉकडाऊन हटवलेले जिल्हे
औरंगाबाद
बुलडाणा
चंद्रपूर
धुळे
जळगाव
जालना
नाशिक
परभणी
नांदेड
ठाणे
वर्धा
यवतमाळ
भंडारा
लातूर
नागपूर
वाशिम
गोंदिया
गडचिरोली
दुसऱ्या टप्प्यात मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबारचा समावेश होईल. तेव्हा या जिल्ह्यांमधले निर्बंध आणखी शिथिल होणार आहेत.
 
राज्यात 30 मे रोजी लॉकडाऊनबाबतचे नवीन नियम जाहीर करण्यात आले होते.
 
'ब्रेक दि चेन'चे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून निर्बंध शिथील करण्यात येतील असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार ही सवलत देण्यात आली आहे.
 
30 मे रोजी 'ब्रेक द चेन' अंतर्गत जाहीर केलेले नियम काय होते?
पालिका स्वतंत्र प्रशासकीय घटक असतील
2011 च्या जणगणनेनुसार 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरपालिका जसे की, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई-विरार, पुणे, पिंपरी चिंचवड , नागपूर, औरंगाबाद, नाशिक यांना कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून समजण्यात येईल.
 
या पालिकांच्या क्षेत्रांव्यतिरिक्तचा जिल्ह्यातील उर्वरित भाग हा वेगळा प्रशासकीय घटक राहील.
 
मुंबईतील नवे नियम
मुंबईत आता अत्यावश्यक सेवांची दुकानं सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत सुरू ठेवता येणार आहेत.
आता इतर दुकानांनासुद्धा सवलती देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत पहिल्या आठवड्यात रस्त्यातच्या उजव्या बाजूची दुकानं सोमवार, बुधवार आणि शुक्रवार सरू राहतील. तर
डाव्या बाजूची दुकानं मंगळवार, गुरूवार आणि शनिवार सुरू राहतील.
त्यानंतरच्या पुढच्या आठवड्यात डाव्या बाजूची दुकानं सोमवार, बुधवार आणि शुक्रवार तर उजव्या बाजूची दुकानं मंगळवार, गुरूवार आणि शनिवार सुरू राहतील.
या दरम्यान ई-कॅामर्स कंपन्यांना आता अत्यावश्यक वस्तूंसोबत इतर आवश्यक वस्तू विकण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पॉझिटिव्हीटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी
 
ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे (12 मे 2021 ब्रेक दि चेन आदेशाप्रमाणे) खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात येतील.
सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवता येतील.
सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा ( केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार , रविवार ती बंद राहतील.
अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील.
दुपारी 3 नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील.
कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही 25 टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील.
संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी देईल.
कृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी 2 पर्यंत सुरु राहू शकतील.
येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते किंवा शनिवार, रविवार सुरु ठेवण्यास परवानगी देऊ शकते.
 
पॉझिटिव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी
 
वरील ज्या पालिका किंवा जिल्ह्यांत पॉझिटिव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरले असतील तर तिथे 12 मे 2021 ब्रेक दि चेन आदेशातील निर्बंध खालीलप्रमाणे वाढविण्यात येतील. अशा जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात येतील आणि कुणाही व्यक्तीला जिल्ह्याच्या आत बाहेर करण्यास परवानगी राहणार नाही.
केवळ कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक, आणीबाणीच्या कोविड प्रसंगीची सेवा देणाऱ्या व्यक्तींचा अपवाद असेल.
उपरोक्त प्रशासकीय घटकांमध्ये न येणाऱ्या इतर सर्व जिल्हे व पालिकांच्या ठिकाणी 12 मे 2021 'ब्रेक दि चेन'चे निर्बंध नेहमीप्रमाणे लागू राहतील.
दुकानांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येते. मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल तसेच 12 मे च्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरूच राहतील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती