मिळालेल्या माहितीनुसार , डिसेंबर २०२३ मध्ये आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथे रानटी हत्तींच्या कळपाने महिला शेतकऱ्याचा बळी घेतला होता. त्यानंतर कुरखेडा व देसाईगंज तालुक्यात गेलेला हत्तींचा कळप तब्बल दीड महिन्यानंतर पुन्हा शंकरनगर येथे परतला.
दरम्यान रानटी हत्तींच्या कळपाने १४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री शंकरनगरातील आठ शेतकऱ्यांच्या मका व कारले पिकाची नासधूस केली. मका पिकाला कणसे येत असल्याने शेतकरी दिवसा पिकांची राखण करीत आहेत. या परिसरात सध्या हत्तींचा वावर असल्याने रात्रीची जागल शेतकऱ्यांनी बंद केली. दरम्यान शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी चिंतेत आहे .
१४ फेब्रुवारीच्या मध्यरात्री २२ च्या संख्येत असलेला रानटी हत्तींचा कळप शंकरनगर परिसरात दाखल होऊन निरंजन हलदार, रविन बाला, सुजय विश्वास, बिधान मंडल, निर्मल मिस्त्री, गौरंग मिस्त्री, कृष्णा माझी, समीर विश्वास आदी शेतकऱ्यांच्या मका पिकाची नासधूस केली. मका आणि कारले पिकांत अक्षरशः तांडव घातला. विशेष म्हणजे, डिसेंबर २०२३ मध्ये शंकरनगरातील एक महिलेला रात्री शेतातच चिरडून ठार केले होते. तेव्हापासून शेतकऱ्यांनी रात्रीची जागल बंद केली होती. आता पुन्हा हत्तींनी एन्ट्री केल्याने शेतकऱ्यांमध्ये पुन्हा हत्तीविषयी दहशत निर्माण झाली आहे.