अजित पवार गटात जाण्याबाबत जयंत पाटील यांच्याविषयीच संभ्रम का निर्माण झाला?

मंगळवार, 8 ऑगस्ट 2023 (08:32 IST)
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधल्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील हे अजित पवार यांची साथ देऊन सरकारमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा काही दिवस सुरू आहे. 5 ऑगस्टला जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचंही बोललं जात होतं.
 
पण जयंत पाटील यांनी या भेटीचं खंडन केलं. ते म्हणाले, “माझ्याविषयी गैरसमज पसरवू नका. मी शाहांना भेटलो याचे काही पुरावे आहेत का? मी संध्याकाळी आणि आज सकाळी पवारसाहेबांसोबत होतो. रात्री दीड वाजेपर्यंत अनिल देशमुख, राजेश टोपेंसोबत बैठकीत होतो."
 
हे स्पष्टीकरण दिल्यानंतर मी शेवटपर्यंत शरद पवारांसोबत राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शरद पवार गटातील इतक्या नेत्यांऐवजी जयंत पाटील यांच्याबाबत हा संभ्रम का निर्माण झाला? त्याची काय कारणं आहेत?
 
आम्हालाच संभ्रम ठेवायचा आहे तर तुम्हाला काय अडचण?
अजित पवार गट सत्तेत सामील झाला. तेव्हा त्यांच्या गटातील आमदारांनी जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाडांवर जोरदार टीका केली.
 
त्याचबरोबर अजित पवार यांनी प्रदेशाध्यक्ष पदी जयंत पाटील यांना काढून सुनील तटकरे यांची नियुक्ती केली. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र करण्याबाबतचं पत्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलं.
 
दोन -तीन दिवस या घडामोडी घडत असताना आठवडाभरावर आलेल्या अधिवेशनात अजित पवार विरूध्द शरद पवार गट असं चित्र बघायला मिळेल असं वाटत असताना राष्ट्रवादीचे आमदार बराच काळ अधिवेशनात अनुपस्थित राहिले.
 
दुसरीकडे जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांनी सर्वांसमोर मारलेली मिठी ही चर्चेचा विषय ठरली.
 
यातून संभ्रम वाढत गेला. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या विरोधी पक्षाच्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते म्हणून उपस्थित राहणं अपेक्षित होतं, पण राष्ट्रवादीचा एकही प्रतिनिधी विरोधी पक्षाच्या पत्रकार परिषदेला उपस्थित नसल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भूमिकेवर शंका घेतली जाऊ लागली.
 
तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तुमच्याकडे आमदारांची संख्या किती आहे हे स्पष्ट नाही त्यामुळे संभ्रम निर्माण होत असल्याचा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “आम्हालाच संभ्रम निर्माण करायचा असेल तर तुम्हाला काय अडचण आहे?” यावरून वाटाघाटी सुरू असल्याची शंका निर्माण होते.
 
वरिष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी सांगतात, “जयंत पाटील यांनी त्यांच्या वागण्यातून आणि बोलण्यातून हा संभ्रम निर्माण केला आहे. पाटील यांनी कितीही नाकारलं तरी खात्रीलायक माहितीनुसार, त्यांना अजित पवार गटाची ऑफर देण्यात आली आहे. त्यांच्यामध्ये वाटाघाटी सुरू असाव्यात.”
 
“जयंत पाटील हे शरद पवार गटातील अनेकांशी बोलताना पुढे कसा निभाव लागणार याबाबत नकारात्मक बोलत असल्याचंही नेते खासगीत सांगतात. त्यांची अधिवेशन काळातील देहबोली अजित पवार गटाकडे झुकणारी होती.”
 
पण अजित पवारांना जयंत पाटील यांच्या येण्याचा काय फायदा असू शकतो? याबाबत पुढे सुधीर सुर्यवंशी सांगतात, “जर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते जयंत पाटील अजित पवार गटात सामिल झाले तर पुढच्या तांत्रिक गोष्टी अजित पवार गटाला सोप्या होतील. त्यासाठी अजित पवार आणि जयंत पाटील यांचं जरी जमत नसलं तरी त्या दोघांनी राजकीयदृष्ट्या एकमेकांची गरज आहे. “
 
तपास यंत्रणांचा दबाव?
जे नेते भाजपसोबत सत्तेत सामिल झाले त्यांच्यावर विरोधकांकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव असल्याचे आरोप करण्यात आले.
 
ज्यांची ईडी चौकशी सुरू आहे असे नेते दबावापोटी भाजपसोबत सत्तेत सामिल होत असल्याचं वारंवार बोललं जातं. हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव अशा अनेक नेत्यांची सत्तेत सामील होण्याआधी ईडी चौकशी झाली होती.
 
पण सत्तेत सहभागी झाल्यावर या नेत्यांवर ईडी चौकशी झाल्याचं दिसून आले नाही. जयंत पाटील यांच्यावरही ईडीची टांगती तलवार आहे.
 
जयंत पाटील यांना काही दिवसांपूर्वी इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस या प्रकरणात ईडी चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं.
 
या प्रकणाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, IL&FS कंपनीला 2008 ते 2014 या कालावधीत रस्ते उभारणीचं कंत्राट मिळालं होतं. हे कंत्राट उपकंत्राटदार देण्यात आलं. उपकंत्राटदाराने कथितरीत्या जयंत पाटील यांच्याशी संबधित कंपन्यांना पैसे दिल्याचा आरोप आहे.
 
जयंत पाटील त्या काळामध्ये राज्याचे गृहमंत्री होते. या प्रकरणामुळेही त्यांच्यावर दबाव असल्याचं बोललं जात आहे.
 
जयंत पाटील अजित पवार गटात गेल्याने कोणाला काय फायदा ?
जयंत पाटील जर अजित पवार गटात सामील झाले तर शरद पवार गटाकडे अनुभवी नेत्यांपैकी संघटना बांधणीसाठी फार कोणी उरणार नाही.
 
त्याचबरोबर शरद पवार गटाचे गटनेते आणि प्रदेशाध्यक्ष अजित पवार गटात सहभागी झाले तर संघटनात्मक आणि राजकीयदृष्ट्या अजित पवारांचं पारडं जड होईल.
 
पण घटनातज्ञांच्या मतानुसार कायदेशीरदृष्ट्या फारसा होणार नाही. घटनातज्ज्ञ उल्हास बापट सांगतात, “गटनेता गेला की दुसरा नेमता येतो. गटनेता नेता दुसऱ्या गटात गेला म्हणजे पक्षाला धोका असं नाही. त्यांच्यावरच्या कारवाईचं पत्र देऊन त्यांना अध्यक्ष पदावरून बडतर्फ करू शकतात.”
 
लोकसभा निवडणूकीच्या दृष्टीने भाजपची पश्चिम महाराष्ट्रात फारशी ताकद नाही. जयंत पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्राच्या जागांसाठी फायदा होऊ शकतो.
 
जयंत पाटील यांची ईडी चौकशी सुरू आहे. त्यातून अनेक नेत्यांना सत्ताधारी पक्षात सामील झाल्यानंतर दिलासा मिळाल्याचं उघड आहे.
 
या तपासाच्या फेऱ्यातून सुटका मिळणार असेल तर जयंत पाटील यांना गट बदलण्याचा निर्णय फायदेशीर ठरेल असं बोललं जात आहे.
 



Published By- Priya Dixit 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती