"पत्राचाळ पुनर्विकास घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत हे राजकीय नेते आहेत. त्यामुळे त्यांना न्यायालयात सुनावणीसाठी आणले जाते, त्यावेळी न्यायालयाबाहेर त्यांचे समर्थक आणि हितचिंतक त्यांना भेटण्यासाठी येत असतील, तसेच राऊत स्वत: प्रसारमाध्यमांसमोर राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींबाबत वक्तव्य करत असतील तर या सगळयाची चिंता तुम्हाला का? तुमची नेमकी अडचण काय?" असा प्रश्न विशेष न्यायालयाने शुक्रवारी (21 ऑक्टोबर) मुंबई पोलिसांना विचारला.
न्यायालयीन कोठडीची मुदत संपल्यावरही त्यांना न्यायालयात आणले जाते. न्यायालयीन कोठडीत असताना राऊत हे प्रसारमाध्यमांबरोबर बोलतात. याबाबत सरकारने पोलीस अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर काळा घोडा येथील सत्र न्यायालयातील सुरक्षेची जबाबदारी असलेल्या कुलाबा पोलिसांतर्फे शुक्रवारी विशेष न्यायालयाकडे याबाबत तक्रार करण्यात आली. त्यावेळी तुम्हाला नेमकी अडचण काय? असा प्रश्न विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी पोलिसांना केला.