मुंबई पोलिसांनी आता वाहनातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 1 नोव्हेंबरपासून सीटबेल्ट बंधनकारक केला आहे. पोलिसांनी याबाबत एक अधिकृत प्रेस नोट जारी केली आहे. सीट बेल्टची सुविधा नसलेल्या वाहनांमध्ये 1 नोव्हेंबर पर्यंत सीट बेल्ट सुविधा बसवणे अनिवार्य आहे असे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळे सीटबेल्ट न घातलेल्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
पोलिसांनी जारी केलेल्या नोटमध्ये म्हटले की, मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम, 2019 नुसार, कलम 194(b) (1) अन्वये जो कोणी सीटबेल्ट न लावता मोटार वाहन चालवत असेल किंवा सीट बेल्ट न लावलेल्या प्रवाशांना घेऊन जात असलेल त तो दंडनीय अपराध आहे. त्यानुसार, सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्टची सुविधा नसलेल्या मोटार वाहनांमध्ये सीट बेल्टची सुविधा बसविण्यासाठी दिनांक 1 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदत देण्यात येत आहे. त्यामुळे सर्व मोटार वाहन चालक आणि वाहनातील सर्व प्रवासी, मुंबई शहराच्या रस्त्यावरून प्रवास करणा-या सर्व प्रवाशांना याद्वारे कळविण्यात येते की, 01 नोव्हेंबर 2022 पासून प्रवास करताना चालक आणि सर्व प्रवाशांनी सीट बेल्ट लावणे बंधनकारक असेल. अन्यथा, मोटार वाहन (सुधारणा) कायदा, 2019 च्या कलम 194(B)(1) अंतर्गत कारवाई केली जाईल.