राज्यपालांच्या सडक्या मेंदुच्या मागील मेंदू कोण आहे? हे सुद्धा शोध घेण्याची वेळ- उद्धव ठाकरे

शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2022 (08:49 IST)
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. हा मुद्दा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून उचलून धरण्यात आला असून, भाजपा आणि मुख्यमंत्री शिंदेवर जोरदार टीका सुरू आहे. याशिवाय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना तत्काळ हटवलं जावं, अशीही जोरदार मागणी सुरू आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर  शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकारपरिषदेत घेत भूमिका मांडली. यावेळी त्यांनी राज्यपाल कोश्यारींवर निशाणा साधल्याचे दिसून आले.
उद्धव ठाकरे म्हणाले, “आपल्या सर्वांना आठवतयं की काही दिवसांपूर्वी आपण इथेच भेटलो होतो तेव्हा, कोश्यारींनी मुंबई, ठाणे परिसरातील मराठी माणसांचा अपमान केला होता आणि तेव्हा मी म्हणालो होतो की यांना आता कोल्हापुरी जोडा दाखवण्याची वेळ आलेली आहे. त्यानंतरही हे महोदय थांबले नाहीत त्यांनी आता छत्रपती शिवाजी महाराजांचा ते जुन्या काळातील आदर्श असं म्हणाले. यावर आमचे कोल्हापुरचे जिल्हाध्यक्ष चांगलं बोलले आहेत, की बाप हा बाप असतो तो जुना आणि नवा कसा काय म्हणणार तुम्ही?, त्यामुळे आदर्श हा आमचा आहेच, ते आमचं दैवत आहे. हळूहळू मला असं वाटतय की ही जी काही शक्कल आहे ती केवळ या राज्यपालांच्या काळी टोपीतून आलेली नाही. त्यामागे कोण आहे, या सडक्या मेंदुच्या मागील मेंदू कोण आहे? हे सुद्धा शोध घेण्याची वेळ आलेली आहे.”
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती