नितीन देसाईंना कर्ज देणारी ‘एडलवाईज एआरसी’ कंपनी नेमकी काय आहे?

रविवार, 6 ऑगस्ट 2023 (16:34 IST)
प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा मृतदेह कर्जत (रायगड) येथील त्यांच्या एनडी फिल्म स्टुडिओमध्ये आढळल्यानंतर एकच खळबळ उडाली.नितीन देसाईंच्या मृतदेहाचं शवविच्छेदन झाल्यानंतर काल (5 ऑगस्ट) त्यांच्यावर एनडी फिल्म स्टुडिओमध्येच अंत्यसंस्कार करण्यात आले.
 
दुसरीकडे, नितीन देसाईंच्या मृत्यूची चौकशीही सुरू झालीय. नितीन देसाईंच्या पत्नी नेहा देसाईंनी खालापूर (रायगड) पोलीस ठाण्यात एडलवाईज कंपनीशी संबंधित पाच जणांविरोधात तक्रार दाखल केली, त्याआधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे.
 
एडलवाईज एआरसी कंपनीचं नाव या मृत्यू प्रकरणात वारंवार येत आहे. यापूर्वी, नितीन देसाईंच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनात वेगवेगळ्या आमदारांनी या कंपनीचा उल्लेख केला.
 
या सगळ्या घडामोडींनंतर एडलवाईज एआरसी कंपनीनंही आपली बाजू मांडणारं पत्रक जारी केलं.
 
नितीन चंद्रकांत देसाईंच्या मृत्यू प्रकरणात वारंवार नाव येणाऱ्या या ‘एडलवाईज एआरसी’ कंपनीबाबत आपण जाणून घेऊ की, ही कंपनी नेमकं काय काम करते, कंपनीच्या संचालक मंडळात कोण कोण आहे?
 
त्यानंतर नितीन देसाईंच्या पत्नी नेहा देसाईंनी नेमके काय आरोप केलेत आणि पोलिसांनी त्यावर आतापर्यंत काय पावलं उचलली आहेत, हे जाणून घेऊ.
 
तसंच, एडलवाईज कंपनीनं जारी केलेल्या पत्रकात त्यांनी काय बाजू मांडलीय, हेही जाणून घेऊ.
 
एडलवाईज एआरसी कंपनी काय काम करते?
एडलवाईज एआरसीचं एडलवाईज असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी (EARC) असं पूर्ण नाव आहे. ही कंपनी ‘एडलवाईज ग्रुप’चा भाग किंवा एक शाखा आहे.
 
‘एडलवाईज एआरसी’ ही एक वित्तीय साहाय्य करणारी कंपनी आहे. ग्राहकांना गरजेनुसार आर्थिक साहाय्य करते.
 
ही कंपनी होम लोन्स, व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज देते. तसंच मालमत्ता व्यवस्थापन (म्युच्युअल फंड आणि पर्यायी मालमत्ता), मालमत्ता पुनर्रचना, विमा या क्षेत्रातही काम करते.
 
एडलवाईज एआरसीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, ‘EARC बँका आणि वित्तीय संस्थांकडून नॉन-परफॉर्मिंग अॅसेट्स (NPAs) मिळवून, त्यांचं ‘सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट, 2002’ मध्ये नमूद केलेल्या नियमांनुसार निराकारण करण्याच्या व्यवसायात आहे.’
या कंपनीचे मुख्यालय मुंबईतील कलिना येथे आहे.
 
या कंपनीचे एकूण 12 लाख ग्राहक आहेत, तर 476 ऑफिस असून, त्यात 11 हजार कर्मचारी करतात. देशातील सर्व मोठ्या शहारांत ही कंपनी कार्यरत असल्याचं कंपनीच्या वेबसाईटवर म्हटलं आहे.
 
Caisse de dépôt et placement du Québec (CDPQ) ही उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठ्या पेन्शन फंड व्यवस्थापकांपैकी एक असलेल्या कंपनीचीही एडलवाईजमध्ये गुंतवणूक असल्याचं एडलवाईज एआरसीच्या वेबसाईटवर म्हटलंय. CPDQ चे एडलवाईज एआरसीमध्ये 20 टक्के एक्विटी स्टेक आहेत.
 
एडलवाईज ग्रुपची स्थापना 1995 मध्ये रसेश शाह आणि वेंकट रामास्वामी यांनी केली आहे.
 
देशभरात अनेक ठिकाणी या कंपनीचे ऑफिसेस आहेत. या शिवाय अमेरिका, हाँगकॉंग, युके सिंगापूर, दुबई मॉरिशस इथेही ही कंपनी कार्यरत असल्याचं त्यांच्या वेबासाईटवर नमूद केलं आहं.
 
एडलवाईज एआरसी ही एडलवाईज ग्रुपमधील कंपनी आहे. या ग्रुपचं तुम्ही नाव अनेकदा ऐकलंही असेल, कारण या ग्रुपनं अनेक खेळांना स्पॉन्सरही केलं आहे.
 
रशेश शाह
रशेश शाह हे एडलवाईज एआरसी ज्या समूहाची भाग आहे, त्यात एडलवाईज ग्रुपचे चेअरमन आहेत. एडलवाईज एआरसीच्या संचालकांच्या यादीतही त्यांचं नाव आहे.
 
त्यांचा विशेष उल्लेख अशासाठी की, नेहा नितीन देसाईंनी खालापूर पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीत याच रशेश शाह यांचं नाव आहे.
 
रशेश शाह यांनी IIM अहमदाबादमधून एमबीएचं शिक्षण घेतलं असून, नवी दिल्लीतल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेडमधून आंतरराष्ट्रीय व्यापार या विषयात डिप्लोमाची पदवी प्राप्त केलीय.
 
2017-18 या कालावधीत भारतातील उद्योगव्यवसायिकांची संघटना असलेल्या ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ अर्थात FICCI चे रशेश शाह अध्यक्षही होते.
 
एडलवाईज एआरसी कंपनीचं नाव कसं समोर आलं?
एडलवाईज एआरसी कंपनीचं या प्रकरणात सर्वात आधी उल्लेख केला तो भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी. नितीन देसाईंच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित झाला होता.
 
यावेळी आशिष शेलार म्हणाले की, “एनडी स्टुडिओवर 180 कोटींचे कर्ज काढले होते. या 180 कोटींचे 252 कोटी झाले. या प्रकरणातून रशेश शाह नामक व्यक्ती आणि ‘एडलवाईज एआरसी’ कंपनीच्या सावकारी पद्धतीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे केवळ अपघाती मृत्यू म्हणून या प्रकरणाची चौकशी न करता या कंपनीच्या व्याजाचा दर, व्याज वृद्धीचा दर, वसुलीची पद्धत या सर्व कार्यपद्धतीची विशेष टीम नेमून चौकशी करावी आणि दिवंगत नितीन चंद्रकांत देसाई यांना न्याय द्यावा.
 
तसंच, भाजप आमदार प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनीही या कंपनीचा उल्लेख करत हा मुद्दा विधानसभेत मांडला होता.
 
त्यानंतर एडलवाईज एआरसी कंपनीचं नाव नितीन देसाईंच्या पत्नी नेहा देसाईंनी त्यांच्या तक्रारीत केला.
 
नितीन देसाईंच्या पत्नी नेहा देसाई यांनी एडलवाईज कंपनीविरोधात 4 ऑगस्ट 2023 रोजी रायगड जिल्ह्यातील खालापूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली.
केयुर मेहता, रशेष शाह, स्मित शाह, आर. के. बन्सल आणि जितेंद्र कोठारी यांची नावं नेहा देसाईंनी तक्रारीत नोंदवली आहेत.
 
“कर्ज प्रकरणांमध्ये नितीन देसाई यांना वारंवार तगादा लावून मानसिक त्रास दिला. त्याच मानसिक त्रासाला कंटाळून देसाई यांनी आत्महत्या केली,” अशी तक्रार नेहा देसाईंनी केल्याचं रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाने काढलेल्या प्रेस नोटमध्ये म्हटलं आहे.
 
त्यांनतर खालापूर पोलीस ठाण्यात कंपनीविरोधात 269/2023, 304, 34 या भारतीय दंड संहितांच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करणार आहेत.
 
एडलवाईज कंपनीचं स्पष्टीकरण
4 ऑगस्टलाच म्हणजे नेहा देसाईंनी पोलीस तक्रार केली, त्याच दिवशी एडलवाईज कंपनीनं आपली बाजू मांडणारं पत्रक जारी केलं.
 
एडेलवेस एआरसीचे कंपनी सेक्रेटरी तरुण खुराणा यांच्या डिजिटल स्वाक्षरीनिशी हे स्पष्टीकरणाचं पत्रक जारी केलंय.
 
प्रसारमाध्यमांमध्ये एडलवाईज एआरसी कंपनीबाबत बातम्या येत असल्यानं स्पष्टीकरण काढत असल्याचं पत्रकाच्या सुरुवातीलाच म्हटलं आहे.
 
एडलवाईज एआरसी कंपनीचं स्पष्टीकरण :
 
"नितीन देसाई यांच्या कंपनीला थीम पार्क आणि भांडवल उभारण्यासाठी 2016 आणि 2018 मध्ये आम्ही आर्थिक साहाय्य केलं होतं. पण 2020 पासून त्यांच्या कंपनीला आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं. त्यांच्या परिस्थिती सुधारण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण ते सर्व फोल ठरले. शेवटी 2022मध्ये हे प्रकरण नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलकडे (NCLT) गेलं.
 
"RBIच्या नियमांनुसार एडलवाईज एआरसीने सर्व कायदेशीर प्रक्रियांचे पालन केले. कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन आम्ही कोणतंही काम केलं नाही. त्यांच्यावर कोणतेही अतिरिक्त व्याज आकारले नाही किंवा ते वसूल करण्यासाठी दबाव टाकला नाही. आम्ही केवळ कायदेशीर मार्ग अवलंबवला आहे.
 
"सरकारी यंत्रणांनी या प्रकरणाची चौकशी केली तर त्याचा आदर करत त्यांना पूर्ण सहकार्य करू."
 
पोलिसांची एडलवाईज कंपनीला नोटीस
5 ऑगस्ट 2023 रोजी रायगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन देसाई मृत्यू प्रकरणात ECL फायनान्स कंपनी/एडलवाईज ग्रुप यांच्या व्यवस्थापकीय संचालकांना नोटीस देऊन विविध मुद्द्यांवर माहिती मागवण्यात आलीय. ही माहिती 8 ऑगस्ट 2023 च्या सकाळी 10 वाजेपर्यंत खालापूर पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष हजर राहून सादर करण्याचीही समज नोटिशीतून देण्यात आलीय.
 
तसंच, एनडी स्टुडिओचे कायदेशीर सल्लागार, आर्थिक सल्लागार आणि अकाऊंटंट यांच्याकडूनही कर्ज प्रकरणातील माहिती पोलीस घेत आहेत.
 
नेहा देसाईंच्या तक्रारीनंतर आतापर्यंत 15 साक्षीदारांकडे विचारपूस करून, त्यांचे जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती खालापूर पोलिसांनी दिलीय.
 
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात या प्रकरणाचा तपास होत असून, त्यांच्या सोबतीला एक पोलीस निरीक्षक, 3 सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि 4 पोलीस अंमलदार असतील, अशी माहितीही देण्यात आलीय.
 





Published By- Priya Dixit 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती