अशी होणार ‘इंडिया’ची मुंबईमध्ये 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला बैठक

शनिवार, 5 ऑगस्ट 2023 (21:03 IST)
विरोधकांची आघाडी ‘इंडिया’ची मुंबईमध्ये 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये इंडिया बैठक होणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली. महाविकास आघाडीच्या नेत्यांची रळीत बैठक पार पडली. या बैठकीतनंतर संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना मुंबईतील इंडियाच्या बैठकीत संदर्भात माहिती दिली.
 
संजय राऊत म्हणाले, “इंडियाची बैठक पार पडली. पाटणा बंगळुरू आणि आता मुंबईत 31ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये इंडियाची बैठक होईल. 31 ऑगस्टला उद्धव ठाकरेकडून डिनरचे आयोजन करण्यात आले आहे आणि 1 सप्टेंबरला संकाळी 10.30 वाजता बैठकीला सुरुवात होईल. यानंतर 3 वाजता पत्रकार परिषद होईल. मुंबईतील बैठकीचे यजमानपद शिवसेनेकडे आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आमचे सहकारी आहेत. आम्ही एकत्र काम करू पण यजमानपद हे शिवसेना उद्धव ठाकरे आहे”, असे त्यांनी सांगितले.
 
मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांशी चर्चा करणार
पाटणा आणि बंगळुरूमध्ये तुमची सत्ता असल्यामुळे इंडियाची बैठक यशस्वी झाली. पण महाराष्ट्रात तुमची सरकार नाही, यामुळे अडचणी येईल का?, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “पाच राज्याचे मुख्यमंत्री आणि अनेक माजी मुख्यमंत्री, अनेक प्रमुख नेते, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन  खर्गे आणि राहुल गांधी आदी नेते उपस्थित राहणार आहेत. यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सहकार्य हवे आहे. कारण मोठे नेते मंडळी उपस्थितीत राहणार असल्यामुळे सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेवर ताण पडू शकतो. त्यामुळे राज्य सरकारने सहकार्य करावे. यासाठी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल, अशी माहिती संजय राऊतांनी दिली.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती