त्यांनी स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आहे, त्यामुळे......: फडणवीस

शनिवार, 5 ऑगस्ट 2023 (20:45 IST)
बारसू प्रकरणावर किमान आदित्य ठाकरे तरी अभ्यास करून बोलतील असे वाटले होते. पण त्यांनी स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आहे. त्यामुळे विरोधाला विरोध करणाऱ्यांना उत्तर देऊन तरी काय फायदा होणार, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी आदित्य ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस महाराष्ट्र पोलिस अकादमीच्या दीक्षांत सोहळ्याच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आले होते.
 
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी नाणार असो की बारसू भाजप महाराष्ट्रद्वेषी असल्याचे वारंवार दिसून येत आहे, अशी तिखट टीका केली होती. त्यांच्या या टीकेला फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 
 
राहुल गांधींवर निशाणा
यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांनी केलेले विधान अयोग्य ठरवले आहे. उच्चपदस्थ लोकांनी असे का म्हणू नये, हे ही स्पष्ट केले आहे. अशा प्रकारचा निकाल आल्यानंतर एका गोष्टीचे समाधान वाटते की, कालपर्यंत सर्वोच्च न्यायालयाला शिव्या घालणारे काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षाचे नेते सर्वोच्च न्यायालयाचे गुणगान करत आहेत. यातून आपल्याला न्याय मिळाला की, सुप्रीम कोर्ट चांगले आणि विरोधात निकाल गेला की, सुप्रीम कोर्ट वाईट असे विरोधकांचे सुरू असल्याचे दिसून येते, असे फडणवीस म्हणाले.
 
ठाकरे गटावर हल्ला
ठाकरे गटाच्या मुखपत्राद्वारे भाजपावर तिखट टीका केली आहे. याविषयी फडणवीस यांना छेडले असता त्यांनी आपण हे मुखपत्र वाचत नसल्याचे स्पष्ट केले. महाराष्ट्र पोलिस दल देशातील अतिशय प्रशिक्षित व शिस्तबद्ध पोलिस दल आहे. देशामध्ये आपल्या पोलिस दलाचा एक मोठा नावलौकिक आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

Edited By - Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती