राहुल गांधींना सावरकरांवरुन तंबी देऊन उद्धव ठाकरेंनी काय साध्य केलं?
मंगळवार, 28 मार्च 2023 (09:25 IST)
"राहुल गांधींना मला एक सांगायचं आहे. तुम्ही कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत चालत गेलात, आम्ही तुमच्या सोबत राहिलो. पण मी राहुल गांधीना जाहीर सांगतो की ही जी लढाई आहे ती लोकशाहीची लढाई आहे. कृपा करुन नव्हे, तर मी त्यांना जाहीर सांगतो की, सावरकर आमचं दैवत आहे. त्यांचा अपमान आम्हाला पटणारा नाही. लढायचं असेल तर दैवतांचा अपमान आम्ही अजिबात सहन करणार नाही."
रविवारी मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना हे बोल सुनावले. अगोदर राहुल यांची खासदारकी रद्द होणे हे लोकशाहीसाठी किती घातक आहे यावर बोलले. राहुल यांना पाठिंबा दाखवला. पण नंतर सावरकरांवरुन जाहीर तंबीही दिली.
संदर्भ अर्थातच सदस्यत्व गेल्यावर दुसऱ्या दिवशी राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्याचा होता.
एका प्रश्नाला उत्तर देतांना ते 'माफी मागायला मी सावरकर नाही, माझं नाव गांधी आहे' असं म्हणाले होते. त्याच्या प्रतिक्रिया लगेचच महाराष्ट्रात उमटल्या होत्या. तशाच प्रतिक्रिया आता उद्धव ठाकरेंच्या सभेतल्या वक्तव्यावरुनही येत आहेत.
गेल्या काही काळात, विशेषत: कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत 'महाविकास आघाडी' स्थापन केल्यावर ठाकरेंनी गांधीच्या सावरकरांवर टीका करण्याविरोधात एवढी स्पष्ट विरोधाची आणि आक्रमक भूमिका पहिल्यांदाच घेतली आहे. ज्यात एका प्रकारे निर्वाणीच्या इशाऱ्याचा नादही ऐकू यावा.
राहुल गांधींची सावरकरांबद्दलची भूमिका काही नवीन नव्हे. ते सातत्यानं सावरकरांनी तत्कालीन ब्रिटिश सरकारकडे मागितलेल्या कथित माफीबद्दल जाहीर बोलत आले आहेत. जेव्हा त्यांची 'भारत जोडो यात्रा' महाराष्ट्रात होती तेव्हाही त्यांनी त्याबद्दल बोलून वादाची राळ उठवली होती.
अर्थात गांधीच्या या भूमिका जेवढा राजकीय त्रास महाराष्ट्रात कॉंग्रेसला होत नाही, तेवढा त्याचा नवा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला होतो.
'हिंदुत्वा'च्या भूमिकेवरुन भाजपापेक्षा आपण वेगळे आहोत आणि 'हिंदुत्व' सोडलं नाही म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपानं कायम सावरकरांच्या मुद्द्यावरुन खिंडीत गाठलं आहे.
राहुल गांधी एवढं सावरकरविरोधी बोलत असतांना सत्तेसाठी तुम्ही त्यांना काहीच बोलू शकत नाही असा आरोप भाजपा कायम करत आलं आहे. 'इकडे आड आणि तिकडे विहीर' अशी ठाकरेंच्या सेनेची सतत अवस्था झाली आहे.
पण आता उद्धव यांनी जाहीर सभेतच सावरकरांवरुन राहुल गांधींना सुनावलं. सहाजिक याचा अर्थ गंभीर आहे आणि परिणामही तसेच आहेत. एवढा काळ सबुरीनं घेणाऱ्या ठाकरेंनी आता गांधींना जाहीर कानपिचक्या का दिल्या असाव्यात?
यातून उद्धव ठाकरे काय साध्य करु पाहत आहेत? यातून सद्य राजकीय परिस्थितीत काय शक्यता दिसतात? एक नक्की, या शक्यतांची गणित आखल्याशिवाय राजकारणात कोणतही वक्तव्यं होत नसतं.
हिंदुत्ववादी वोटबँक राखण्याचा प्रयत्न?
'महाविकास आघाडी' स्थापन झाल्यावर एका टीकेला सातत्यानं उद्धव ठाकरेंना सामोरं जावं लागलं, ती म्हणजे, हिंदुत्ववादाचा त्याग.
हा टीकेचा रोख भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत असलेली शिवसेना या दोघांचाही राहिलेला आहे. हिंदुत्वाच्या वर्तमान राजकीय रुपामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हे महत्त्वाचं नाव आहे. सावरकरांनीच त्याची मांडणी त्यांच्या लेखांतून आणि भाषणांतून केली.
रा.स्व.संघप्रणित हिंदुत्व आणि सावरकरप्रणित हिंदुत्व अशी महाराष्ट्राच्या राजकीय विचारविश्वात स्वतंत्र मांडणी होत आली आहे.
जेव्हा बाळासाहेबांनी 80 च्या दशकात शिवसेनेला हिंदुत्वाच्या वाटेवर नेलं तेव्हापासून सावरकरांशी शिवसेनेनं कायम जवळीक साधलेली आहे.
हिंदुत्वासोबतच सावरकरांचं मराठी भाषेसाठीचं कार्य, त्यांचं मुंबईतलं वास्तव्य हे सगळं मराठी अस्मितेचं राजकारण करणाऱ्या शिवसेनेला स्वत:शी जोडता आलं. त्याचा शिवसेनेला मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात वाढायला फायदा झाला.
'आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती केली' हे सांगणाऱ्या भाजपा-शिवसेना मैत्रीतही सावरकरप्रेम हा समान धागा होता. त्यांच्यावर जेव्हा जेव्हा टीका-समीक्षा झाली तेव्हा शिवसेना आक्रमक झाली. काही वर्षांपूर्वीचा कॉंग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांच्या सावरकरांबद्दलच्या विधानांनंतर शिवसेनेनं रस्त्यावर उतरुन केलेलं आंदोलन उदाहरणादाखल.
ऐतिहासिक तथ्यांवरुन नेहमी सावरकर हा महाराष्ट्रातल्या अभ्यासकांसाठीही कुतुहलाचा आणि मतमतांतराचा विषय राहिला.
पण राजकीय मैदानात हिंदुत्ववादी शिवसेना नेहमी सावरकरांच्या बाजूनं आक्रमक राहिली आहे. या भूमिकेनं सेनेच्या मतदारांमध्येही सावरकर समर्थक सातत्यानं राहिले.
पण काँग्रेससोबत गेल्यानंतर शिवसेनेची सावरकरांबद्दल भूमिका काय आहे हा प्रश्न त्यांना सातत्यानं टोचून विचारला गेला. या काळात राहुल गांधी मात्र सावरकरांवर सतत टीकात्मक बोलत राहिले. कॉंग्रेससोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेची अडचण झाली.
किमान समान कार्यक्रमावर आघाडी झाली आहे किंवा वैचारिक मतभेद आहेत अशा स्पष्टिकरणांनंतरही ही टीका होत राहिली. अनेक वेळेस ठाकरे आणि शिवसेनेची अडचण झाली.
पण शिवसेनेच्या फुटीनंतर आता मतदारांचीही विभागणी होते आहे. प्रत्येक मत महत्त्वाचं ठरतं आहे. अशा वेळेस केवळ 'आम्ही हिंदुत्व सोडलं नाही' असं वारंवार सांगण्यापेक्षा काही भूमिका घेणं उद्धव ठाकरे यांना भाग होतं असं म्हटलं जातं आहे.
ती भूमिका घेऊन उद्धव यांनी आपल्या मतदारांना संदेश देण्याचा प्रयत्न आहे की ते अजूनही सावरकर आणि हिंदुत्वाच्या बाजूचे आहेत आणि त्यासाठी ते राहुल गांधींनाही सुनावायला मागेपुढे पाहणार नाही.
सावरकर हा महाराष्ट्रात महत्त्वाचा मुद्दा ठरु शकतो. मुंबईच्या मराठीबहुल भागांमध्ये आणि राज्यातल्या इतर तशाच भागांमध्ये तो थेट निवडणुकीच्या गणितावरही परिणाम करणारा ठरु शकतो. म्हणूनच आपला या मुद्द्यामुळे तयार झालेला पारंपारिक मतदार आपल्याशी जोडलेला ठेवण्यासाठी ठाकरे यांनी भर सभेत त्याविषयी विधान केलं.
"जेव्हापासून उद्धव ठाकरे 'मविआ;मध्ये सामील झाले आहेत तेव्हापासून ते एक सॉफ्ट हिंदुत्ववाद जपत आहेत. पण दुसरीकडे सावरकरांवरुन भाजपा आणि शिंदे गट सातत्यानं त्यांची कोंडी करत आहेत. तो मुद्दा परत परत येतो. पण आता राहुल गांधी जे म्हणाले त्यानंतर जर उद्धव ठाकरे यांनी जर मौन बाळगलं असतं तर अधिक टीका झाली असती. ते अडचणीचं होतं. म्हणून ही भूमिका घेण्यासाठी मालेगावसारखं ठिकाण निवडलं," असं वरिष्ठ राजकीय पत्रकार संदीप प्रधान म्हणतात.
पण त्यांच्या या भूमिका घेण्यामुळे वा न घेण्यामुळे त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या मतदारांवर काही परिणाम होईल असं प्रधान यांना वाटत नाही.
"सेनेची हिंदुत्ववादी भूमिका ही भाजपासारखी नाही. ती वैचारिक नाही. ती जसं ठाकरेंनी सांगितलं तशी आहे. त्यांच्या मतदारही संघासारखा नाही. जो संघाचं साहित्य वाचत असतो. सेनेच्या मतदारांनी सावरकर किती वाचले यावरही प्रश्न चिन्हं आहे. पण सावकरांबद्दल त्यांनी सोसलेल्या हालअपेष्टांमुळे एक भावना महाराष्ट्रात आहे. खासकरुन ब्राम्हण वर्गात त्यांचं जास्त आकर्षण आहे. त्याचा परिणाम होतो," असं प्रधान म्हणतात.
भाजपाला प्रत्युत्तर, पण टीका थांबेल?
एका बाजूला आपल्या पारंपारिक मतदारांना संदेश देतांनाच उद्धव यांनी एका प्रकारे त्यांच्यावर सातत्यानं होत असलेल्या राजकीय टीकेलाही उत्तर दिलं आहे.
त्यांनी भूमिका घेतली नाही किंवा ते गप्प राहिले असं कदाचित त्यांच्या विरोधकांना आता म्हणता येणार नाही, पण त्यामुळे तो प्रश्न संपेलच असं नाही.
उद्धव ठाकरे यांचं विधान आल्यावर आणि त्याची राज्यभर चर्चा झाल्यावर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधींच्या निमित्तानं उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा तोफ डागली.
'सावरकरांचा अपमान सहन करणार नाही म्हणाले पण मग करणार काय? महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?' असा उलट सवाल शिंदेंनी ठाकरेंना विचारला आहे.
दुसरीकडे स्वातंत्रवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनीही उद्धव यांच्या सभेतील भूमिकेवर प्रतिक्रिया देतांना असा प्रश्न विचारला आहे की, "ठाकरेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात अशी वक्तव्य होत असतांना कॉंग्रेसवर काही कारवाई का नाही केली? त्यामुळे ठाकरेंनी आता भूमिका घेतली असली तरीही सावरकरांच्या मुद्द्यावरुन टीका कॉंग्रेसशी आघाडी असेपर्यंत त्यांच्यासाठी संपेल असं नाही."
"भाजपा राहुल गांधींविरुद्ध देशभर आक्रमक आहेच. त्यांना 'भारत जोडो यात्रे'पासून जास्त महत्त्व येतं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सावरकर हा मुद्दा मिळाला आहे. तो जेव्हा येईल तेव्हा सोबतच उद्धव ठाकरेंची कोंडी करण्याची संधीही येते. त्यामुळे हे राजकारण असंच सुरु राहिल," असं राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणतात.
दुसरीकडे कॉंग्रेस राष्ट्रवादीसोबत आघाडी करुन उद्धव ठाकरेंनी बेरजेचं राजकारण केलं, असं म्हटलं जातं. हिंदुत्ववादी मतांसोबत ते मुस्लिम, दलित आणि इतर मतदारांकडेही वळले.
गेल्या काही काळात त्यांच्या या नव्या भूमिकेमुळे अशा मतदारांचाही ठाकरेंच्या सेनेकडे ओढा वाढल्याचं पाहायला मिळतं. 'महाविकास आघाडी'मध्ये या तीनही पक्षांचे मतदार काही पोटनिवडणुकांमध्ये एकत्र आल्याचंही दिसलं.
पण आता सावरकरांविषयी घेतलेल्या भूमिकेमुळे हे नवे मतदार ठाकरेंविषयी कसा विचार करतात हे पण महत्वाचं आहे. एकाच वेळेस उदारमतवादी आणि हिंदुत्ववादी विचारांना सध्याच्या राजकीय स्थितीत एकत्र बांधू पाहण्याचा त्यांच्या प्रयत्न काय परिणाम घडवेल आणि मतदार समजूत दाखवतील का हा प्रश्न आहेच.
राहुल गांधी समजून घेतील का?
उद्धव ठाकरेंनी राहुल गांधीना त्यांच्या सभेत सुनावलं आहे. त्यामुळे इथे हा प्रश्न येतोच की राहुल हे ठाकरेंचं ऐकतील का? 'भारत जोडो यात्रा' असेल किंवा त्याच्या पूर्वी आणि नंतरही असेल, राहुल यांनी सतत सावरकरांवर टीका केली आहे.
पण उद्धव ठाकरे यांनी 'सावरकर आमचे दैवत आहे' असं म्हटल्यानं राजकीय समजून दाखवून राहुल पुढे अशी टीका करणार नाहीत असं होईल का?
या मुद्द्यावर 'महाविकास आघाडी'ची परिक्षा असेल. त्यातही राहुल आणि ठाकरे यांची. कारण राहुल यांनी ठाकरेंचं म्हणणं मान्य केलं तर त्यांना माघार का घेतली असं विचारलं जाईल.
गेल्या काही काळापासून ते भाजपा आणि संघ यांच्याविरुद्ध राजकीय हिंदुत्ववादाविरुद्ध एक वैचारिक लढाई करण्याचा प्रयत्न करत आहेत. 'भारत जोडो यात्रा' हीसुद्धा त्या लढाईचाच एक भाग असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
तिथंच हिंदुत्ववादाचे पुरस्कर्ते असलेल्या सावरकरांविरोधातली भूमिका येते. पण सध्या राजकीय युती असलेले उद्धव ठाकरे सहन करणार नाहीत म्हणून राहुल आता नमते घेतील का? तात्कालिक राजकीय गरज म्हणून वैचारिक मतभेद असतांनाही तडजोडीची भूमिका अनेक राजकीय पक्षांकडून घेतली जाते. त्यात नवीन काही नाही.
पण तसं राहुल गांधी करतील का हाच प्रश्न आहे. उद्धव यांनी वैचारिक मतभेद असले तरी लोकशाही वाचवण्यासाठी आपण एकत्र येणं आवश्यक आहे असं म्हटलं आहे. पण ते गांधींना पटेल का?
दुसरीकडे, जर राहुल गांधींनी हे मानलं नाही तर उद्धव ठाकरे काय करतील? काय या मुद्द्यावर ते कॉंग्रेसशी सध्या असलेली युती तोडतील का? म्हणजे सावरकर हा 'महाविकास आघाडी'तल्या फुटीचा मुद्दा होऊ शकतो का?
आघाडीनं एकत्र येऊन गेल्या काही काळात निवडणुका जिंकल्या आहेत. त्यात सगळ्यांत जास्त फायदा कॉंग्रेसला झाला आहे. त्यामुळे राजकीय समजुतदारपणा कोण दाखवतं हे पाहायचं.
कॉंग्रेसकडनं असं सांगितलं जातं आहे की उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी एकमेकांशी लवकरच बोलून आपल्य भूमिका स्पष्ट करतील.
आता ते कधी होतं आणि हा तणाव कधी संपतो हे महत्त्वाचं ठरेल. ठाकरेंची सेना तूर्तास तरी ठाम आहे आणि सोमवारी दिल्लीत विरोधी पक्षांच्या कॉंग्रेसनं बोलावलेल्या बैठकीला ते या मुद्द्यावर गेले नाहीत.
संदीप प्रधान यांना वाटतं की राहुल यांनी आपली लढाई कोणाशी आहे हे न समजता जर समजूतदारपणा दाखवला नाही तर या आघाडीतलं हे मोठं दुखणं बनू शकतं.
"राहुल यांनी समजून घेतलं पाहिजे की त्यांची लढाई मोदींशी आहे, सावरकरांशी नाही. पण जर तरीही ते बोलत राहिले तर अडचणी निर्माण होऊ शकतात. ते जर मोदींवर बोलत राहिले तर ठाकरे आणि गांधी दोघे जवळ राहतील. अंतर्विरोध असलेले पक्ष एकत्र राहतात हा इतिहास आहे. त्यामुळे आता समान प्रतिस्पर्धी कोण हे समजून त्याप्रमाणे वागलं नाही तर अडचणी वाढू शकतात," असं प्रधान म्हणतात.
"कोणत्याही आघाडीत असे मतभेद असायचेच. त्यामुळे मला वाटत नाही अधिक काही अडचण आघाडीत होईल. पण कसं असतं की काही मुद्दे असे लगेच सोडता येत नाहीत. त्याला वेळ लागतो. आघाडी करुन सरकार स्थापन केलं तरी सोनिया गांधींच्या विदेशी मूळाच्या प्रश्न राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसनं बराच काळ सोडला नव्हता. त्यामुळे सेना आणि कॉंग्रेसमध्येही तो असाच असेल आणि त्यावरुन ते दोघे एकमेकांना असे इशारे देत राहतील," अभय देशपांडे म्हणतात.