आयोगाच्या माध्यमातून महिलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न राहील : रुपाली चाकणकर

गुरूवार, 21 ऑक्टोबर 2021 (21:50 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसच्यामहिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर, त्यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. चाकणकर यांनी आपला पदभार स्विकारला, त्यावेळी राज्यातील सर्वच घटकांत काम करणाऱ्या स्त्रियांसाठी हा आपला आयोग वाटावा, यासाठी मी कार्यरत राहीन, असा विश्वास रुपाली चाकणकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर व्यक्त केला आहे.
 
खासदार शरद पवार, उपमुख्यमंञी अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, अन्न पुरवठा मंञी छगन भुजबळ, महाविकास आघाडीतील सर्व मंत्री आणि इतर सर्व सन्माननीय नेते यांचे मी मनापासून आभार मानते, या सर्वांनी राज्य महिला आयोगावर काम करण्याची मला संधी दिल्याचं चाकणकर यांनी म्हटलंय. तसेच, आज देशामध्ये महाराष्ट्र हे सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अतिशय प्रगत असे राज्य आहे त्यामुळे आपल्या महिलांसाठी काम करताना हे अतिशय जबाबदारीचे व आव्हानात्मक असे पद आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या आत्मसन्मानासाठी काम करताना कर्तव्यपूर्वक आणि प्रभावीपणे मी निश्चितच काम करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 
दरम्यान, राज्यातील महिलांना महिला आयोगाच्या माध्यमातून योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी मला आपल्या सर्वांचेच सहकार्य लागेल आणि ते सहकार्य आपण कराल याची खात्री मला आहे. पहिल्याच दिवशी आश्वासनांची स्वप्न दाखवणार नाही कामाच्या माध्यमातून या जबाबदारीला पुर्णपणे न्याय देईल आणि ‘महिला आयोग’ हा महाराष्ट्रातील सर्व वर्गातील सर्व स्त्रियांसाठी ‘आपला आयोग’ वाटावा यासाठी मी पूर्ण निष्ठेने कार्यरत राहील, असेही त्यांनी म्हटले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती