कोंबडीच्या पिल्लाची शिकार केल्याने मांजरीचा गोळी झाडून खून

गुरूवार, 21 ऑक्टोबर 2021 (16:02 IST)
मुक्या प्राण्यांच्या जीवासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणारे अनेक प्राणी प्रेमी असतात परंतु जळगावातील एका माथेफिरूने चक्क एका मांजरीला बंदुकीची गोळी घालून ठार केल्याचा दुर्दैवी प्रकार गुरुवारी सकाळी घडला आहे. आपल्या कोंबडीच्या पिल्लाची शिकार केल्याने त्या माथेफिरूने हे निर्दयी कृत्य केले आहे.
 
जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगरात रामानंद नगर बस स्टॉपजवळ पुष्पराज बाणाईत हे परिवारासह राहतात. परिसरात असलेल्या भटक्या मांजरीचे ते संगोपन करतात. बाणाईत यांच्या घराशेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने कोंबड्या पाळल्या असून गुरुवारी सकाळी मांजरीने कोंबडीच्या एका पिल्लाची शिकार केली. आपल्या कोंबडीचे पिल्लू मारल्याचा राग आल्याने त्या माथेफिरूने घरातून छर्रेची बंदूक आणत थेट मांजरीचा जीव घेतला. कपाळाच्या मधोमध गोळी लागल्याने मांजर तडफडून मेली.
 
बाणाईत यांच्यासह परिवाराने शेजारी राहणाऱ्या व्यक्तीला याबाबत जाब विचारला असता ‘मी असाच आहे, मी असाच आहे’ असे बेजाबदारपणाचे उत्तर त्या माथेफिरूने दिले. इतकंच नव्हे तर ‘त्या काळ्या मांजरीचा देखील मी जीव घेईल’ अशी धमकी देखील त्याने दिली. बाणाईत यांच्यासह त्यांच्या मित्राने माथेफिरू बंदूकीने निशाणा साधत धमकी देत असल्याचा व्हिडीओ जळगाव लाईव्हकडे पाठविला आहे. त्यात मांजर देखील तडफडून मरताना दिसत आहे.
 
बाणाईत यांच्यासह काही प्राणी प्रेमी हे तक्रार करण्यासाठी रामानंद नगर येथे पोहचत असून बंदुकीने गोळी झाडणारा व्यक्ती फोटोग्राफर आणि स्वतः प्राणी प्रेमी असल्याचे समजते. जळगाव शहरातील नागरिकांकडून निर्दयीपणे मांजरीचा जीव घेणाऱ्या व्यक्तीविरुद्ध संतप्त प्रतिक्रिया उमटत असून कठोर कारवाईची मागणी होत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती