बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामुळे या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. परंतु, या कार्यक्रमात त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. “मी मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना खात्री देऊ इच्छितो की विकासासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठिशी राहू”, असा शब्द शरद पवारांनी बारामतीतील कार्यक्रमातून सरकारला दिला आहे.
बारामतीत आयोजित करण्यात आलेल्या नमो रोजगार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे व सरकारमधील इतर काही मंत्री एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. या कार्यक्रमाच्या सुरुवातील शरदपवार यांचे भाषण झाले. यावेळी ते म्हणाले की, विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक तरुण-तरुणींना नोकऱ्या मिळाल्या. देशात मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हाच प्रश्न ओळखून आता सरकारने तरुणांना नोकऱ्या देण्याचे ठरवले आहे. तरुणांना रोजगार मिळावा म्हणून ते प्रयत्न करत आहेत, त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो आणि आभारदेखील मानतो. आतापर्यंत विद्या प्रतिष्ठानच्या मार्फत अनेक तरुणांना रोजगार दिला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची मदत घेतली आहे.