औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोधच आहे, असे काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ठणकावून सांगितले आहे. ते जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. औरंगाबादचे नामांतर हा महाविकासआघाडी सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोगामचा भाग नाही. औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोध आहे. आमची नुरा कुस्ती सुरु नाही तर आम्ही या मुद्द्यावरुन भाजप आणि एमआयएमसोबत थेट नुरा कुस्ती खेळायला तयार आहोत, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले.
दुसरीकडे औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला विरोध दर्शविणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात शनिवारी मराठा आंदोलकांचा रोष दिसून आला. मराठा ठोक क्रांती मोर्चाकडून शनिवारी औरंगाबादेत आक्रमक आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी बाळासाहेब थोरात यांच्या प्रतिमेला जोडे मारत तो फाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले.