मुसळधार पावसामुळे नाशिकमधील धरण हाऊसफुल्ल झाले आहेत. भावली, वालदेवी, आळंदी, ओझरखेड, वाघाड, तिसगाव, हरणबारी आणि केळझर या ८ धरणांची जवळपास शंभरचा आकडा गाठला आहे. तर गंगापूर, दारणा , मुकणे, पालखेड, पुणेगाव धरण जवळजवळ ६५ टक्के भरल्याने जिल्ह्यातील पाणीसाठा ७३ टक्क्यांवर आला आहे. जिल्ह्यातील काही धरणांतून सलग पाचव्या दिवशी देखील पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गोदावरी, दारणा आणि कादवा नद्यांचा पूर कायम असल्याचे चित्र आहे. अशात पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस कायम आहे. त्यामुळे धरणसाठ्यात वाढ सुरू राहिल्यास पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येऊ शकतो. आधीच नद्यांना आलेल्या पुरामुळे नागरिकांना स्थलांतरित करण्याचं काम सुरू आहे. त्यासोबतच नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात येत आहे.