महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावर्षी यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०२० साठी समितीने एमकेसीएलचे माजी व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांची निवड केली. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी विवेक सावंत यांचे कौतुक केले.
शरद पवार म्हणाले, मला आनंद आहे की, यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०२० साठी समितीने एमकेसीएलचे माजी व्यवस्थापकीय संचालक विवेक सावंत यांची निवड केली. विवेक सावंत यांनी संगणक शिक्षण क्षेत्रात विशेष योगदान दिले आहे. शांत, संयमी, मितभाषी असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे.विवेक सावंत स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन आपल्या क्षेत्रात काम करत आले आहेत.
संगणकाचे ज्ञान विस्तारीत स्वरूपात आणण्यात त्यांचा प्रमुख सहभाग होता. तत्कालीन शिक्षण मंत्री दिलीप वळसे पाटील हे एमकेसीएलचे पहिले अध्यक्ष असताना या विभागाची स्थापना त्यांनी सावंत यांच्या सहकार्याने केली.नंतर राजेश टोपे यांच्यावर या संस्थेची जबाबदारी होती. त्यांनीही या संस्थेचा विस्तार कसा होईल, याची काळजी घेतली. सावंत यांच्या कामात यत्किंचितही ढवळाढवळ न करता उलट त्यांचे कार्य कसे पुढे जाईल, याची दक्षता या दोघांनीही घेतली.आज सावंत यांचे कार्य केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिलेले नाही. तर ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचले आहे.
बिहारसारख्या राज्यात देखील एमकेसीएलचे काम सुरू आहे. आखाती देशात देखील एमकेसीएलचे काम पोहचले आहे. आगामी काळात संगणक शिक्षित आणि संगणक अशिक्षित ही एकप्रकारची दरी समाजात राहता कामा नये, असे मला वाटते. साक्षरतेची चर्चा आता वेगळ्या दृष्टीने व्हायला हवी. ज्ञानाच्या कक्षा वाढत असून त्याचा फायदा नव्या पिढीला मिळावा यादृष्टीने सावंत यांनी केलेली कामगिरी महत्त्वाची आहे.