महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी उपस्थिताना संबोधित करताना सांगितले, राज्याचा पर्यटन विभाग पैठणी साडी, वारली पेटींग आदींची ओळख जगाला करुन देण्याचा प्रयत्न करीत आहे. सुरजकुंड मेळ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गड-किल्ले, गुंफा व अन्य पर्यटनस्थळ प्रदर्शित करण्यात आले आहेत. राज्याच्या हस्तकलाकारांनाही या मेळ्याच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली असल्याचे त्यांनी सांगितले. राज्याला लाभलेला ७५० कि.मी चा समुद्र किनारा, घनदाट जंगल, अजिंठा वेरुळ सारख्या जग प्रसिध्द लेण्या, ३५० गड-किल्ले आदी पर्यटनाची सामर्थ्य स्थळे आहेत. देश विदेशातील पर्यटकांनी महाराष्ट्रातील या पर्यटन स्थळांना भेट द्यावी, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.यावेळी हरियाणाचे पर्यटन मंत्री रामबिलास शर्मा , भारतातील थायलंडचे राजदूत चुटिन्ट्रोन गोंगस्कडी,. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव तथा सुरजकुंड प्राधिकरणाचे अध्यक्ष योगेंद्र त्रिपाठी, हरियाणा पर्यटन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव तथा सुरजकुंड मेला प्राधिकरणाचे उपाध्यक्ष विजय वर्धन,महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव विनीता सिंघल यांनी उपस्थितांना संबोधीत केले.हरियाणाच्या ‘लूर’ या प्रसिद्ध लोक नृत्याचे सादरीकरण यावेळी झाले. थायलंडच्या कलाकारांनी झायलोफोन वादनाचे सादरीकरण केले तसेच सुरीन प्रोव्हिन्सच्या कलाकारांनी ‘कृतदा हिनिहीन’ लोकनृत्य सादर केले. महाराष्ट्राच्या कलाकारांनी ‘लावणी’ हे प्रसिध्द लोकनृत्य सादर केले.