सिटीलिंक बसमधून नाशिक दर्शन !

सोमवार, 18 एप्रिल 2022 (15:05 IST)
नाशिक शहर आणि परिसरात असणाऱ्या पर्यटन स्थळांची माहिती देण्यासाठी नाशिक एसटी महामंडळाची नाशिक दर्शन ही बस सेवा सुरू होती, मात्र गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेला संपामुळे ही सेवा बंद आहे. मात्र आता नव्याने नाशिक दर्शन सुविधा प्रवाशांना घेता येणार आहे.

नाशिक शहर आणि लगतच्या परिसरात अलीकडेच सुरू झालेल्या सिटीलिंक बस सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यानुसार आता सिटी लिंकच्या माध्यमातून नाशिक दर्शन ई-सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. याबाबत नाशिक महानगर परिवहन महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक तथा महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी याबाबत सूचना केल्या आहे.

सध्या नासिक सिटी लिंक बसची सेवा त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, ओझर, सायखेडा, सिन्नरपर्यंत गेली आहे. मात्र अशाप्रकारे सेवेचा विस्तार करताना आता नाशिक दर्शन’ सेवा प्रवाशांना उपलब्ध होणार आहे. नाशिक शहरात राज्य परिवहन महामंडळाची नाशिक दर्शन सेवा अगोदरच तोट्याचे कारण दाखवून बंद करण्यात आली होती. त्याच धर्तीवर सिटीलींक ने देखील ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. कोरोना निर्बंध शिथिल झाल्याने नाशिक शहरात आता पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असून धार्मिक पर्यटनाला गर्दी होत आहे.
 
त्यानुसार रामकुंड, श्री काळाराम मंदिर, सीता गुफा, तपोवन त्याचबरोबर सोमेश्वर, बालाजी मंदिर, पांडवलेणी हि शहरातील तर त्र्यंबकेश्वरला जाताना अंजनेरी, नाणे संशोधन केंद्र आणि त्र्यंबकेश्वर मंदिर अशी अनेक स्थळे उपलब्ध असताना नाशिक दर्शनची बस नसल्याने पर्यटकांना खाजगी गाड्यांचा आधार घ्यावा लागतो. शहरात रिक्षाचालकांकडून तर मनमानी भाडे आकारले जाते. मात्र आता सिटी लिंकची नाशिक दर्शन सुविधा उपलब्ध झाल्यानंतर प्रवाशांना सोयीस्कर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक सिटीलिंककडून नाशिक दर्शन ही सेवा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे निर्देश आयुक्त रमेश पवार यांनी दिले आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती