विजय वडेट्टीवार : राणेंसोबत शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आले आणि आता विरोधी पक्षनेतेपदी

मंगळवार, 1 ऑगस्ट 2023 (22:54 IST)
"विरोधी पक्षनेतेपद विजय वडेट्टीवारांना मिळालं. पण खरं म्हणजे काँग्रेस पक्ष त्यांना निवडणुकीच्या तोंडावरच संधी देतं आणि निवडणूक संपल्यानंतर दुसऱ्याला संधी देतं.”
 
चार वर्षांपूर्वी म्हणजे 2019 च्या जून महिन्यात काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात अभिनंदन प्रस्तावात हे विधान केलं होतं. त्यावेळी वडेट्टीवारांकडे अगदी अचानकच विरोधी पक्षनेतेपद आलं होतं. कारण तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसला राम राम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता.
 
वडेट्टीवारांकडे विरोधी पक्षनेतेपद अगदी विधानसभा निवडणुकीच्या तोंडवरच आलं होतं. वडेट्टीवार ज्या विदर्भातून येतात, त्या विदर्भातून काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत चांगला विजयही मिळाला होता.
 
फडणवीस चार वर्षांपूर्वी म्हणाले होते, त्याचप्रमाणे वडेट्टीवारांकडे पुन्हा एकदा विरोधी पक्षनेतेपदाच्या निमित्तानं महत्त्वाचं पद आलंय, मात्र तेही निवडणुकीच्या तोंडावरच. लोकसभा निवडणुकीला अगदी सात-आठ महिन्यांचा, तर विधानसभा निवडणुकीला साधारण वर्षभराचा अवधी बाकी आहे.
 
वडेट्टीवारांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करून, काँग्रेसनं आपल्या बालेकिल्ल्यात म्हणजेच विदर्भात प्रतिनिधित्त्व दिलंय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि आता विरोधी पक्षनेते म्हणून विजय वडेट्टीवार हे दोघेही विदर्भातील असतील.
 
वडेट्टीवारांच्या निवडीचं निमित्त साधत, त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा आपण थोडक्यात आढावा घेऊ.
 
शिवसेना ते काँग्रेस व्हाया राणेंचं बंड
1962 साली जन्मलेल्या विजय वडेट्टीवारांची राजकीय कारकीर्द सुरू झाली अगदी महाविद्यालयीन दिवसांपासून. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून आलेल्या विजय वडेट्टीवारांनी एनएयूआयच्या माध्यमातून विद्यार्थी आंदोलनांमध्ये सहभाग घेतला. हा काळ 1980-81 चा होता.
 
चंद्रपुरातील गोंडपंपरी तालुक्यातील करंजी हे त्यांचं जन्मगाव. पुढे राजकीय वाटचालीत चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर असे जिल्हे त्यांच्या कारकीर्दीच्या केंद्रस्थानी राहिलेले दिसून येतात.
 
महाविद्यालयीन काळात काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेतून आंदोलनं केली असली, तरी पुढे त्यांनी शिवसेनेच्या झेंडा खांद्यावर घेतला आणि चंद्रपूर जिल्ह्यात विविध आंदोलनं त्यांनी केली.
 
1991 ते 1993 दरम्यान ते गडचिरोली जिल्हा परिषदेचे नामनियुक्त सदस्य बनले. पुढे राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार असताना, 1996 ते 1998 दरम्यान वडेट्टीवारांकडे महाराष्ट्र वन विकास महामंडळाचं अध्यक्षपद देण्यात आलं. या पदाला राज्यमंत्री दर्जा होता. वडेट्टीवारांच्या राजकीय कारकीर्दीतलं हे पहिलं राज्यव्यापी पद होय.
 
1998 साली त्यांना शिवसेनेनं विधानपरिषदेची आमदारकी दिली आणि पहिल्यांदा ते विधिमंडळाची पायरी चढले.
 
पुढे 2004 साली ते पहिल्यांदा शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात उतरले. चंद्रपूरच्या चिमूर मतदारसंघातून त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकली आणि आमदार बनले.
 
याच काळात म्हणजे 2005 साली शिवसेनेत माजी मुख्यमंत्री नारायण राणेंनी बंड केलं. नारायण राणेंच्या समर्थनार्थ उभे राहिलेल्या 11 आमदारांमध्ये विजय वडेट्टीवार हेही होते. पुढे नारायण राणेंनी प्रवेश करताच काँग्रेसमध्ये महसूलमंत्री पद सांभाळलं. त्यांच्या समर्थकांमधील विजय वडेट्टीवारांना मंत्रिपदासाठी तीन वर्षे वाट पाहावी लागली.
 
2008 साली विजय वडेट्टीवारांना जलसंपदा, आदिवासी विकास आणि पर्यावरण वने या खात्यांचं राज्यमंत्रिपद मिळालं. मात्र, हे पद एकच वर्षे सांभाळता आलं. कारण वर्षभरात विधानसभा निवडणुका झाल्या आणि ते पुन्हा एकदा चिमूर मतदारसंघातून निवडून आले.
 
त्यानंतर म्हणजे 2009 साली जलसंपदा, ऊर्जा, वित्त व नियोजन आणि संसदीय कार्य या खात्यांचं राज्यमंत्रिपद वडेट्टीवारांकडे आलं.
 
2014 साली काँग्रेसची सत्ता गेली, मात्र वडेट्टीवार काँग्रेससोबतच राहिले. विधानसभेत त्यांच्याकडे उपनेतेपद आलं. पुढे राधाकृष्ण विखे-पाटील विरोधी पक्षनेतेपदी असतानाच, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं, रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली.
 
आता पुन्हा एकदा त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपद आलंय.
 
‘वडेट्टीवारांकडे विरोधी पक्षनेतेपदाचा काँग्रेसला फायदाच’
 
वरिष्ठ पत्रकार संजय तुमराम यांच्याशी बीबीसी मराठीनं याबाबत संवाद साधला. त्यांच्या मते, विदर्भानं काँग्रेसला आजवर भरभरून दिलंय. किंबहुना, विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणूनच ओळखला जातो. अशा भागातील नेत्याला विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यानं काँग्रेसनं बालेकिल्ल्याकडे दुर्लक्ष न केल्याचा संदेश दिला गेलाय.
 
तसंच, संजय तुमराम यांनी वडेट्टीवारांची राजकीय कारकीर्द पत्रकार म्हणून जवळून पाहिलीय. ते वडेट्टीवारांच्या नेतृत्त्वगुणांचा उल्लेख करत म्हणतात की, “विजय वडेट्टीवार हे उत्तम संघटक आहेत. शिवाय, आक्रमक नेते म्हणूनही ओळखले जातात. याच गुणांच्या नेत्याची सध्या काँग्रेसला गरज आहे. त्यामुळे वडेट्टीवारांचा काँग्रेस पक्षाला फायदा होऊ शकतो.
 
“वडेट्टीवार आधी चिमूर आणि नंतर ब्रह्मपुरी मतदारसंघातून विधानसभेत निवडून गेलेत. मतदारसंघ बदलूनही त्यांनी विजयी होणं सोडलं नाही. किंबहुना, त्यांच्या मतदारसंघात नरेंद्र मोदींची सभा झाली, तरीही ते विजयी झाले. वडेट्टीवारांनी आपलं यश राखण्यातलं सातत्य दाखवून दिलंय. शिवाय, मंत्री म्हणून राज्यव्यापी मुद्द्यांवरही आवाज उठवलाय. हा विचार त्यांना विरोधी पक्षनेतेपद करताना झाला असावा.”
 
विधिमंडळात भाजप ज्या पद्धतीने विरोधकांवर तुटून पडतं, ते पाहता त्याच आक्रमकणे भिडण्याची वृत्ती विरोधकांमध्ये वडेट्टीवारांकडे आहे, म्हणून त्यांचं विधिमंडळात काँग्रेसला फायदा होऊ शकतो, असंही संजय तुमराम यांना वाटतं.
‘काँग्रेसअंतर्गत समतोल साधण्याचाही प्रयत्न’
ज्येष्ठ पत्रकार आणि लोकमतेच विदर्भ आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने यांच्याशीही बीबीसी मराठीनं बातचित केली.
 
श्रीमंत माने म्हणतात, “विदर्भातलेच नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि आता विरोधी पक्षनेतेपदी विजय वडेट्टीवार निवडले गेलेत. पटोलेंवर नाराज असलेला एक गट काँग्रेसमध्ये आहे. त्यांना शांत करण्यासाठीही वडेट्टीवारांची निवड महत्त्वाची ठरेल. काँग्रेसच्या विदर्भातील संघटनेत अंतर्गत समतोल राखण्याच्या प्रयत्नही या निवडीतून दिसून येतो.”
 
तसंच, “विजय वडेट्टीवार हे आक्रमकपणे भूमिका घेणार आहेत. विदर्भात नव्याने चर्चेत आलेल्या आणि महत्त्वाचे बनलेल्या नेत्यांची जी यादी आहे, त्यात वडेट्टीवार प्रमुख आहेत. त्यात आणखी सुनील केदार आहेत किंवा इतर अनेकजण. पण वडेट्टीवार त्यांच्या ठाम भूमिकांमुळे आणि संघटनेवरील पकडीमुळे उठून दिसतात. हे काँग्रेसला विदर्भात आणि राज्यातही फायद्याचं ठरू शकतं,” असंही श्रीमंत माने म्हणतात.
 



Published By- Priya Dixit 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती