३ कोटी नागरिकांशी संपर्क साधणार भारतीय जनता पार्टीतर्फे ६ एप्रिल रोजी स्थापना दिनानिमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पुढील वर्षभरात राज्यातील ३ कोटी नागरिकांशी संपर्क साधून केंद्रातील मोदी सरकारच्या तसेच राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती दिली जाईल, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ आणि विक्रांत पाटील, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. बावनकुळे म्हणाले की, स्थापना दिनानिमित्त केंद्रीय कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभरातील पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पक्षाच्या सर्व बूथ समित्यांवर स्थापना दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील ९७ हजार बुथवर राष्ट्रवादी, काँग्रेस, उद्धव ठाकरे गट अशा वेगवेगळ्या पक्षांतील कार्यकर्त्यांचे भाजपामध्ये प्रवेशाचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. स्थापना दिनानिमित्त पक्षाच्या प्रदेश कार्यालयातही ध्वजारोहण होणार आहे.