बारामतीत कोरोना प्रतिबंधित लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात याव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. बारामती येथे कोरोना विषाणू निर्मूलन आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी पवार बोलत होते.
शासनाच्या नवीन नियमावलीप्रमाणे शासकीय कार्यालयात व इतर खासगी आस्थापनेत ५० टक्के उपस्थितीत काम करणं गरजेचं आहे. प्रशासनानं सामान्य नागरिकांच्या कामावर तसंच विकास कामांवर परिणाम होणार नाही, याचं नियोजन करावं. ऑक्सिजन बेडची कमतरता भासणार नाही,याची दक्षता घ्यावी अशा सूचना पवार यांनी केल्या आहेत.
१ एप्रिलपासून वयोगट ४५ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण देण्याच्या सूचना आहेत, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी लसीकरण केंद्रांची संख्या वाढवावी. इतर आजार असणाऱ्या रुग्णांच्या लसीकरणाकरिता केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. बारामती शहरात काही नागरिक मास्क वापरताना दिसत नाहीत. शासनाच्या नियमांचं पालन करताना दिसत नाहीत. बाजाराच्या ठिकाणी गर्दी करत आहेत. यावर प्रशासनानं कडक उपाययोजना करुन दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.