कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या उपकेंद्रासह यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विभागीय केंद्र पुण्यात होणार

गुरूवार, 25 मार्च 2021 (07:40 IST)
मुंबई, कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक-नागपूर या विद्यापीठाचे उपकेंद्र बालेवाडी-पुणे येथे तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विभागीय केंद्र पुणे येथे तर उपकेंद्र बारामती येथे सुरु करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत घेण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक-नागपूर व यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक’चे उपकेंद्र, विभागीय केंद्र स्थापन करण्याबाबतच्या बैठकीचे आयोजन  करण्यात आले होते. 
 
कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक-नागपूरचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रात आहे. विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात या विश्वविद्यालयाचे उपकेंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या उपकेंद्रात संस्कृत भाषेसह, इंडोलॉजी, संस्कृत भाषांतर आधुनिक शिक्षणाचा अभ्यासक्रम शिकविण्यात येणार आहे. या उपकेंद्रासाठी पुण्यात तातडीने जागा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. विश्वविद्यालयाच्या कुलगुरुंनी या उपकेंद्रासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची माहिती तातडीने देण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.
 
पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विभागीय केंद्र बालेवाडी-पुणे येथे करण्यात येणार आहे. या विभागीय केंद्राचा उपयोग एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना होणार आहे. बारामती येथे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे उपकेंद्र स्थापन करण्यात येणार आहे. या उपकेंद्रासाठी शासनाची जागा तातडीने उपलब्ध करुन देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. बारामती येथील उपकेंद्रात यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाबरोबरच अद्ययावत ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. या ग्रंथालयाचा लाभही विद्यार्थ्यांना होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती