मुंबई महानगरपालिका शाळेतील बालवाडी ते १० वीच्या २२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना डीबीटी योजनेद्वारे शालेय गणवेश मिळाले आहेत. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी गणवेशासाठी १२ कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली होती, अशी माहिती उपायुक्त योगेश कडूस्कर यांनी दिली.
नावाजलेल्या शहरातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासाठी पालिकेने प्रशस्त शाळांच्या इमारती उभारल्या आहेत. तर मराठी,हिंदी,इंग्रजी,उर्दू आदी माध्यमाच्या आणि सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू आहेत. त्यामुळे पालिका शाळेत पटसंख्या वाढत आहे. शैक्षणिक वर्ष २०१४-१५ मध्ये शासनाच्या माध्यमातून डीबीटी योजने अंतर्गत गणवेश आणि अन्य शालेय साहित्य देण्याच्या सूचना दिल्या होत्या.
शैक्षणिक वर्ष २०१६-१७ पासून पालिकेच्या माध्यमातून या धोरणाच्या अंलबजावणीला सुरुवात करण्यात आली होती. मात्र पालकांचा फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने ई-रूपी प्रणालीद्वारे हे साहित्य देण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता.यासाठी निविदा प्रक्रियाही राबवण्यात आली होती. तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणार्या गणवेशासह सर्व शैक्षणिक साहित्याचे नमुन्याची पडताळणी प्रयोगशाळाद्वारे देखील करण्यात आले होती. परंतु या संदर्भात कार्यादेश देण्याची बाब अंतिम टप्प्यात असतानाच आयुक्तांना गणवेश डीबीटीतून वगळण्यात आल्याचे परिपत्रक निदर्शनास आणून देण्यात आले.त्यामुळे गणवेश वगळता अन्य साहित्य ई रूपी प्रणालीद्वारे देण्याचे ठरले. मात्र निविदा काढून गणवेश पुरवठा करण्यास विलंब होणार असल्याचे प्रशासनाचे लक्षात आल्यानंतर पूर्वी प्रमाणे डीबीटी योजनेद्वारे विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला.