उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकर यांनी केली युतीची घोषणा

सोमवार, 23 जानेवारी 2023 (13:19 IST)
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा केली आहे. आज दुपारी या दोन्ही नेत्यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी म्हणून आम्ही दोघं एकत्र येत आहोत. पुढे राजकीय वाटचाल कशी असेल, याविषयी विचारविनिमय करुन आम्ही पुढे जाऊ."
 
"शिवशक्ती आणि भिमशक्तीचा प्रयोग याआधी झाला होता. पण प्रकाश आंबेडकर आणि मी पहिल्यांदाच या वास्तूमध्ये एकत्र आलो आहे. पुढे एकत्रित चालण्यासाठी एकत्र येतोय."
 
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांच्या युतीमुळे निवडणुकांमध्ये आता बदलाचं वातावरण सुरू होणार आहे."
 
"गेली अनेक वर्षे उपेक्षितांचं राजकारण अशी चळवळ अमलात आणण्याचा प्रयत्न आमचा होता. पण आमच्याच मित्र पक्षाने ही चळवळ गिळंकृत करण्याचा प्रयत्न केला किंवा मर्यादित करण्याचा प्रयत्न केला."
 
"शरद पवार आणि आमचं भांडण जुनं आहे. पण ते आमच्याबरोबर येतील, अशी अपेक्षा मी बाळगतो," असंही आंबेडकर म्हणाले.
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेनेच्या वतीनं आज राज्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे.
 
दुसरीकडे आज विधीमंडळामध्ये राज्य सरकारच्या वतीनं बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं.
 
या युतीबद्दल बोलताना शिवसेना नेते सुभाष देसाईंनी म्हटलं होतं की, "आमचं मनातून सगळं ठरलं आहे, आता फक्त घोषणा बाकी आहे."
 
"माझी युती ही फक्त शिवसेनेसोबत असेल, महाविकास आघाडीमधील इतर दोन सहकारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबद्दल काय ठरवायचं ते नंतर पाहू," असं वक्तव्य वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं.
 
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर म्हणाले होते की, "वंचित आणि शिवसेना युतीवर शिवसेनेकडून घोषणा होऊ शकते. यावर अजूनही दोन्हीकडून चर्चा सुरू आहे.
 
"उद्धव ठाकरे यांनी या युतीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेतलं पाहिजे असं मत मांडलं होतं. सध्या वंचित आणि शिवसेना युती होईल. माझी युती ही शिवसेनेसोबत असेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नंतर पाहून घेऊ."
 
Published By- Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती