उद्धव ठाकरेंना पवारसाहेब जास्त लाडके झाले आहेत आणि शिवसैनिक परके : दीपक केसरकर

सोमवार, 11 जुलै 2022 (21:06 IST)
पक्षाबाबत बाळासाहेब ठाकरेंचा अजेंडा होता. त्यानुसार त्यांना काँग्रेससोबत कधीच बसायचं नव्हतं. ते म्हणायचे की, मी एकटाच शिवसेनेत उरलो तरी काँग्रेससोबत जाणार नाही. पण आता उद्धव ठाकरेंनी त्यांनाच जवळ केले आहे. उद्धव ठाकरेंना पवारसाहेब जास्त लाडके झाले आहेत आणि शिवसैनिक परके झाले आहेत. हवंतर तुम्ही जनमताचा कौल घ्या. कोणत्याच शिवसैनिकाला काँग्रेससोबतची आघाडी नको आहे. आयुष्यभर ज्या लोकांविरोधात लढलो त्या पक्षासोबत एकत्र बसायला कोणत्याच शिवसैनिकाला आवडलं नाही, असं दीपक केसरकर म्हणाले. त्यांनी  पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. 
 
शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या बंडखोर गटाने एकमेकांविरुद्ध केलेल्या याचिकांवरील सुनावणीला आज सर्वोच्च न्यायालयात सुरुवात झाली. तथापि, या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्यास नकार देतानाच, न्यायालयाचा निकाल येईपर्यंत 16 आमदारांच्या निलंबनाबाबत कोणताही निर्णय घेऊ नका, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना दिले. या निर्णयामुळे शिवसेना आणि शिंदे गटातील सर्वच आमदारांना दिलासा मिळाला असल्याचं मत आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं. दरम्यान, नवीन मुख्यमंत्री येणं, सरकार येणं हे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचं होतं. आता सरकार स्थापन झालं आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेवर तातडीने सुनावणी होणं गरजेचं नाही. सर्वोच्च न्यायालय सवडीनुसार निकाल देईल. जो निकाल येईल तो आम्हा सर्वांना मान्य असेल, असंही ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती