मिरज तालुक्यातील बेडग येथे सार्वजनिक तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या दोघा सख्ख्या भावंडांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली.आय्याज युनूस सनदी (वय- ९)आणि आफान युनूस सनदी (वय- ७)अशी मयत भावंडांची नावे आहेत. या घटनेमुळे बेडगसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बेडग गावातील नागरगोजेवाडी येथे सार्वजनिक पाझर तलाव आहे. सुमारे दहा ते पंधरा फूट खोल असलेल्या या तलावात काही दिवसांपासून म्हैसाळ जलसिंचन प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले आहे. या तलावापासून दोनशे मीटरच्या अंतरावर युनूस सनदी यांचे घर आहे. त्यांची दोन्ही मुले आय्याज आणि आफान हे तलावात मासे पकडण्यासाठी गेले होते.
तलावात लहान मासे असल्याने दोघेही भाऊ तलावाच्या पाण्यात उतरून मासे पकडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तलावातील डबक्यांचा अंदाज न आल्याने यातील आफान हा पाण्यात बुडाला. त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना आय्याज हा मोठा भाऊ देखील बुडाला. दोन्ही मुले तलावात बुडून गटांगळ्या खात असल्याचे दिसल्यानंतर तेथे जवळच असलेले रियाज मुजावर हे धावत आले. त्यांनी दोन्ही मुलांना तळ्यातून बाहेर काढले मात्र दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे बेडगसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक रणदिवे, तलाठी प्रविणकुमार जाधव, पोलीस पाटील शारदा हांगे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
Edited by : Ratnadeep Ranshoor