सोशल मिडियावर मॅसेज पाठवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न

शनिवार, 13 जानेवारी 2024 (10:19 IST)
नाशिक  : काही दिवसांपूर्वी खून केल्याबाबतची व्हिडिओ क्लिप व्हायरल करून साक्षीदारांच्या मनात भिती निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मिडियाद्वारे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी बाळु छगन आठवले (वय 41, रा. इंदिरा गांधी वसाहत, जुने सिडको) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आठवले यांचा पुतण्या दिपक प्रकाश आठवले यांनी त्यांच्या मोबाईल फोनवर काही व्हिडिओ पाठवले. हे व्हिडिओ इन्टाग्राम या सांकेतिक स्थळावर ओम्याभाईजी खटकी या सांकेतिक स्थळावरुन गुन्हेगार ओम्याखटकी व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी आठवले यांचा पुतण्या संदीप आठवले याचा काही दिवसांपूर्वी खून केल्याबाबतची व्हिडिओ क्लिप केल्याचे सांगितले.
 
हे व्हिडिओ फिर्यादींनी पाहिले असता, त्यात संदीप आठवले यांच्या खूनाच्या गुन्ह्यातील साक्षीदारांच्या मनात भिती निर्माण करुन समाजात दहशत पसरवण्याचे कृत्य करत आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच व्हिडिओ क्लिपच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन वाचले असता वेगवेगळ्या इन्टाग्राम अकाऊंटवर गुन्हेगारीला प्रेरणादायी व चालणा देणाऱ्या कमेंट्स दिसून आल्या.
 
याबाबत बाळू आठवले यांनी अंबड पोलीस ठाण्यास यासंदर्भात फिर्याद दिली असून, याप्रकरणी आरोपी महेश गिते, राहुल प्रकाश डोंब, गौरव जाधव, केशव दिघे, साई चव्हाण, आर.एन. नवले, चेतन दिनकर पाटील, चेतन बहिरम व यांसह वेगवेगळ्या इन्टाग्राम धारकां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By -  Ratnadeep ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती