महिला घरात सुरक्षित नाहीत हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. ही घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. स्व कर्तुत्व सोडून चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेराहून पैसे आणावेत यासाठी वर्षापूर्वी लग्न झालेल्या सुनेला सासरच्या लोकांनी मच्छर मारण्याचे विषारी औषध पाजले आहे. घटना बीड शहरातील अंकुशनगर भागात घडली आहे. याप्रकरणी बीड पोलीस ठाण्यात नराधम पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
क्रांती नितीन मुंडे (वय २५) असे त्या विवाहितेचे नाव असून, क्रांती यांचे लग्न मागील वर्षी उस्मानाबाद जिल्ह्यातील पवारवाडी येथील नीतीन मुंडे याच्यासोबत झाले. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने चांगला संभाळ केल्यानंतर सासरच्या लोकांनी त्यांना कार घेण्यासाठी माहेराहून चार लाख रुपये आणावेत म्हणून क्रांतीकडे रोजच तगादा लावला होता.
क्रांतीच्या वडिलांनी जमीन विकून आलेले पैसे क्रांतीच्या सासरच्या लोकांना दिले होते. दरम्यान नीतीन, क्रांती नोकरीनिमीत्त पुण्यात आले. पुण्यात आल्यानंतर पैशांची कमतरता पुन्हा भासू लागली, मग पुन्हा क्रांतीला माहेराहून पैसे आणण्यासाठी तिच्या मागे लागले. पैशांसाठी तिचा शारिरीक , मानसिक छळ सरु केला. हा प्रकार तिच्या वडिलांना समजल्यानंतर त्यांनी ५० हजार रुपये आणून दिले.
सासरच्या लोकांकडून क्रांतीला होत असलेल्या त्रासामुळे तिच्या आई-वडिलांनी तिला डिसेंबर महिन्यात घरी नेले होते. मात्र बुधवारी क्रांतीचा पती, सासरा, दीर हे बीडला क्रांतीच्या माहेरी आले. त्यावेळी पती नितीन याने तिला बोलण्याच्या बहाण्याने एका खोलीत घेऊन गेला. या ठिकाणी तिला मच्छर मारण्याचे औषध बळजबरीने पाजले. यानंतर सर्वांनी या ठिकाणाहून पळ काढला. क्रांतीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार तिला हे औषध सासरच्या लोकांनी पाजले होते. अत्यवस्थ अवस्थेतील क्रांतीवर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून, क्रांतीच्या जबाबावरून तिचा पती नितीन मुंडे, सासरा अभिमन्यू, दीर सचिन, नणंद कल्पना दत्तात्रय बांगर, नणंदेचा पती दत्तात्रय बांगर आणि सासऱ्याचा भाऊ दशरथ बांगर या सहा जणांवर शिवाजीनगर पोलिसात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.